
कुडाळ : शुक्रवार दि. २६/०५/२०२३ रोजी मध्यरात्री ०३ वाजता ३० वर्षीय एका महिलेवर दुर्मिळ प्रकारच्या एक्टोपिक प्रेग्नेंसी साठी दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. सदर महिलेला गेल्यावर्षी डाव्या बाजूच्या गर्भनळीमध्ये गर्भधारणा होऊन डाव्या बाजूची गर्भनळी काढून टाकण्यात आली होती. ही गर्भनळी काढून सुद्धा, जो थोडा गर्भनळीचा भाग गर्भपिशवीला जोडलेला असतो. त्या भागामध्ये परत गर्भधारणा होऊन तो भाग पोटात फुटला, यामुळे सदर महिलेच्या पोटात दीड ते दोन लिटर पोटामध्ये रक्तस्त्राव झाला. त्यामुळे तिच्यावर तातडीने रात्री ०३ वाजता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून गर्भनळीचा तो भाग काढून टाकण्यात आला. अश्या प्रकारची गर्भधारणा अतिशय दुर्मिळ असून जगभरात आत्तापर्यंत मात्र २७ केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. सदर अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल मधील स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ. मृदुला महाबळ, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ. पूर्वा राऊत, डॉ. शैलेंद्र शिरवाडकर (भूल तज्ञ), नितीन कसाळकर, नमिता सावंत (नर्सिंग स्टाफ), रोहन हरमळकर (वॉर्डबॉय) या संपूर्ण टीमने सदर शस्त्रक्रिया अगदी यशस्वीरीत्या पार पाडली.