आज ३ वाजता आरोंदा - परेल एसटी वेंगुर्ला डेपोतून सुटणार..!

उबाठा शिवसेनेच्या मागणीला यश : संजय गावडे
Edited by: दिपेश परब
Published on: September 11, 2023 10:55 AM
views 130  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला आगारातून नियमित सुटणारी आरोंदा ते परेल ही एसटी फेरी प्रवाशांच्या अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र ती अलीकडच्या काळामध्ये बंद ठेवण्यात आली होती. याबाबत  ही फेरी सुरू करण्यासाठी प्रवाशांकडून होणारी मागणी लक्षात घेता ही एसटी फेरी सुरू करण्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ला आगर व्यवस्थापकांची भेट घेऊन १० सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान ही बस फेरी आज (११ सप्टेंबर) पासून दुपारी ३ वाजता सुरू होणार असून उबाठा शिवसेनेच्या मागणीला यश आले असल्याची माहिती एसटी कामगार सेना संघटना अध्यक्ष संजय गावडे यांनी दिली आहे. 

आरोंदा सहित इतर भागातून ही एसटी बस सुरू करण्याची सातत्याने मागणी होत होती. काही दिवसात येणारा गणेशोत्सव पाहता ही फेरी १० सप्टेंबर रोजी सुरू करण्यात यावी अन्यथा ११ सप्टेंबर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उबाठा शिवसेनेतर्फे देण्यात आला होता. तसेच खासदार विनायक राऊत यांनी ही बस फेरी सुरू करण्याबाबत राष्ट्रीय परिवहन मंडळ मुंबईचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांचे ३० ऑगस्ट रोजी पत्राद्वारे लक्ष वेधले होते. या सर्व मागण्यांमूळे अखेर ही बस फेरी सुरू करण्यात आल्याची माहिती संजय गावडे यांनी दिली आहे.