
सावंतवाडी : वेंगुर्ले येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय खुल्या निबंध लेखन स्पर्धेत येथील सुनीतादेवी टोपीवाला अध्यापक विद्यालयाचे उपक्रमशील प्रा. नागेश कदम यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. आनंदयात्री वाङ्मयाचा त्रैवार्षिक साहित्य संमेलन सोहळा पार पडला. या सोहळ्यात कवी आनंद हरी, मंडळाचे अध्यक्ष साहित्यिक वृंदा कांबळी, संजय घोगळे, प्रा. संजय पाटील, डॉ. आनंद बांदेकर यांच्या उपस्थितीत प्रा. कदम यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
प्रा. कदम यांनी 'समाज आणि साहित्य यांचा संबंध' या विषयावर निबंध लिहिला होता. त्यांनी दीडशेहून अधिक निबंध, १०० हून अधिक कविता, लेख, संशोधन प्रकल्प आदींचे लेखन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे, प्राचार्य हेमंत प्रभू यांनी अभिनंदन केले.