अपघातात युवकाचा मृत्यू !

ठोकर देऊन पळालेल्या गाडीचा शोध घेण्यास यश
Edited by:
Published on: November 21, 2023 19:53 PM
views 1946  views

सिंधुदुर्ग : १२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दुचाकीस ठोकर मारून पलायन केलेल्या तसेच एका युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गाडीचा शोध घेण्यास सिंधुदुर्गनगरी पोलिसांना यश आले आहे. सीसीटिव्हीद्वारे ठोकर मारणाऱ्या वाहनाचा शोध लागला असून सांगली जिल्ह्यातील निगडी हरिजन वसाहत येथील तुषार प्रकाश घोलप या चालकाने हा अपघात घडविला होता. सिंधुदुर्गनगरी पोलीस पथकाने येथे जात अपघातातील महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MH-09/FL-1279 हे वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच वाहन चालकास पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस वाहन मालकास बजावण्यात आली आहे. 

     मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नरकासुर दहनाच्या आदल्या रात्री १२ नोव्हेंबर रोजी रात्री  १२.२५ ते १२.४० वाजण्याच्या दरम्यान हा कसाल हायस्कूल समोर मुंबई गोवा रस्त्यावर भीषण अपघात झाला होता. कसाल बागवेवाडी येथील प्रथमेश दिलीप बागवे (वय २६) आणि सिध्देश्वर दिनकर बागवे (वय ३२) हे एक्टिवा गाडी नंबर एम एच ०७- ए एल १८३२ या दुचाकीने कसाल बाजारपेठ येथे नरकासुर पाहण्यासाठी जात असताना बोलेरो पिकअप वाहनाने मागून ठोकर दिली. त्यानंतर तो वाहन चालक वाहनासह पळून गेला. यानंतर दोघानाही सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना पहाटे ५ वाजता प्रथमेश बागवे याचा मृत्यू झाला होता. तर दुसरा सिध्देश्वर बागवे याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या सिध्देश्वर यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. या अपघातात एक्टिवा गाडीचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी त्या वाहन चालकावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

       अपघातास कारणीभूत होऊन पळून गेलेल्या अज्ञात वाहनाची ओळख पटवण्याकरता सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात अपघात करुन पळून जाणारे वाहन सांगली भागातील असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने अपघातास कारणीभूत अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नितीन कदम आणि पोलीस हवालदार विवेक नागरगोजे, शिपाई वैभव जाधव यांचे पथक शिराळा जिल्हा सांगली येथे गेले होते.  या ठिकाणी जाऊन अपघातातील वाहन महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MH-09/FL-1279 हे निष्पन्न केले. तसेच स्थानिक पोलीस ठाण्याची मदत घेऊन सदरचे वाहन ताब्यात घेतले आहे.

          अपघात घडला त्यावेळी वाहनावर चालक म्हणून तुषार प्रकाश घोलप, रा.निगडी हरिजन वसाहत हा असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे या वाहनावरील चालकास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे हजर ठेवण्याबाबत गाडी मालक यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व  सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षण मनीष कोल्हटकर, उपनिरीक्षक नितीन कदम, पोलीस हवालदार विवेक नागरगोजे, शिपाई वैभव जाधव यांनी केली आहे.