
सावंतवाडी : भारतीय सैन्य दलातून ३३ वर्षे सेवा करून निवृत्त झालेले तळवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर नित्यानंद गुणाजी सावंत यांचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. महिलांनी औक्षण करून आणि पुरुषांनी पुष्पवृष्टी करून त्यांना आदराने घरी आणले. या अभूतपूर्व स्वागताने ते भावूक झाले.
सुभेदार मेजर नित्यानंद सावंत यांनी तळवडे येथील शारदा विद्या मंदिर शाळा क्रमांक ४ मध्ये प्राथमिक शिक्षण आणि श्री जनता विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते पुण्याला गेले. तेथे सैनिकी प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊन त्यांनी सैन्य दलात प्रवेश मिळवला.
त्यांनी भोपाळ, हिसार, रांची, पठाणकोट, पुणे, चंदीगड, लेह, नवगाव, जोधपूर, दिमापूर, अमृतसर, जम्मू-काश्मीर आणि सिकंदराबाद यांसारख्या विविध ठिकाणी देशाची सेवा केली. त्यांनी शिपाई पदापासून ते सुभेदार मेजर पदापर्यंत मजल मारली. विशेष म्हणजे, जून २००४ ते डिसेंबर २००६ या काळात त्यांनी भूतानच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय सैन्याच्या तुकडीत काम केले.
याप्रसंगी बोलताना त्यांनी आपले वडील कै. गुणाजी सावंत (दोन वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त) यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच आपण सैन्य दलात ३३ वर्षे देशसेवा करू शकलो, असे आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमाला तळवडे विकास संस्थेचे अध्यक्ष बाबुराव उर्फ आप्पा परब, श्री जनता विद्यालय तळवडे ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य शाम मालवणकर, जिल्हा बँकेचे माजी अधिकारी विलास नाईक, तळवडे अर्बन सोसायटीचे अध्यक्ष विलास परब आणि उपाध्यक्ष राजू परब, सिद्धेश्वर ग्रामोत्कर्ष मंडळाचे रवींद्र सावंत, युवा उद्योजक बाळू मालवणकर, चंद्रा शेटकर, प्रकाश परब, प्रवीण परब यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.