शाळा, संस्था राबवत असलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभाग घ्यावा : वसंत दाभोलकर

वेंगुर्ल्यातील जबरदस्त सांस्कृतीक, कला, क्रिडा मंडळ, राऊळवाडातर्फे सत्कार
Edited by:
Published on: June 14, 2023 18:47 PM
views 94  views

वेंगुर्ले : भारतीय प्रशासन सेवेच्या परिक्षेत संपूर्ण देशातून ७६ वा नंबर पटकावत अखिल भारतीय स्तरावर सिंधुदुर्गचा टॅलेंट चा झेंडा रोवणारा दाभोली गावचा सुपुत्र वसंत दाभोलकर याने वेंगुर्ले तालुक्याचे नाव देशांत रोशन केले. तसेच आपल्या जिल्ह्यात तसेच तालुक्यातूनही यु.पी.एम.सी. व एम.पी.एस.सी. परीक्षांत या परीक्षेत येथील विद्यार्थी यश पटकावू शकतात हे दाखवून देणाऱ्या वसंत दाभोलकर चा जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या जबरदस्त सांस्कृतीक, कला, क्रिडा मंडळ, राऊळवाडातर्फे खास शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरांत जबरदस्त सांस्कृतिक कला, क्रिडा मंडळ, राऊळवाडा यांनी आयोजित केलेल्या यु.पी.एस.सी. परिक्षेत देशात ७६ वा आलेला दाभोली गावचा सुपुत्र व वेंगुर्ले शहरातील वेंगुर्ला हायस्कुलचा विद्यार्थी वसंत प्रसाद दाभोलकर तसेच दहावी व बारावीतील तालुका दैदिप्यमान यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचा गौरव आणि सामाजिक कार्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचा गौरव सोहळा नगरपरीषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपिठावर वसंत दाभोलकर, कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खामकर, रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यशवंत उर्फ दाजी परब, रविंद्र परब, मानकरी सुनिल परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, मंडळाचे संस्थापक सदस्य अजित राऊळ मंडळाचे अध्यक्ष साबाजी परब, मंगेश परब, प्रसाद दाभोलकर यांचा समावेश होता.

या कार्यक्रमांत अध्यक्ष पदावरून बोलताना नगरपरीषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी, यु.पी.एस.सी. एम.पी.एस.सी. आय.पी.एस. या सारख्या स्पर्धा परीक्षात येथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नगरवाचनालय वेंगुर्ले संस्था व वेंगुर्ले नगरपरीषद यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नियोजित आहे. या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ऑनलाईन पध्दतीनेही करता येतो.  याभागातील टॅलेंटपणा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसंत दाभोलकर हे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेस बसण्याची तयारी करा. त्यात तुम्हाला निश्चीतच यश  मिळेल असे प्रतिपादन केले.

 या प्रसंगी बोलताना यु.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी वसंत दाभोलकर हे म्हणाले, आपल्या भागातील विद्यार्थी हे टॅलेंटच आहेत. या भागातील शाळा, संस्था या जे उपक्रम राबवितात त्यातील विविध स्पर्धात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे किंबहुना त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आपल्याला यु.पी.एस.सी. मुलाखतीत दशावतार, कासव याबद्दलही प्रश्न विचारले गेले होते. अन त्याची मी निर्भिडपणे उत्तरे दिली. कारण आपल्या भागातील विविध गोष्टींची माहिती करुन घेण्याची गरज आहे. त्यासाठी वकृत्व स्पर्धाच विद्यार्थ्यांना निर्भीड बनवतात. असे स्पष्ट करीत माझा पहिलाच गौरव श्रीदेव रामेश्वर मंदिरात होत आहे म्हणजे देवतेचा आशिर्वाद माझ्यावर आहे. असेही उदगार काढले.

 यावेळी बारावीतील सानिकाकुमारी यादव सिध्दी भिडे, ऋतुजा उगवेकर, मंगल शेणई, विश्ववेता वारंग, ऋग्वेदी नार्वेकर, तसेच दहावीतील प्रतिक्षा नाईक, परी सामंत, सानिका सावंत, तृषा वारंग, हर्षाली परुळेकर, रूचिरा बागायतकर संस्कृती नाईक यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जबरदस्त मंडळाचे संस्थापक सदस्य अजित राऊळ यांनी तर सुत्रसंचालन व आभाराचे काम सामाजिक कार्यकर्ते काका सावंत यांनी मानले.