
दोडामार्ग : दोडामार्ग हा गोवा आणि महाराष्ट्राला गेल्या कित्येक दशकांपासून जोडणारा महत्त्वाचा दुवा. कन्नड भाषेतील ‘दोडा’ या शब्दाचा अर्थ ‘मोठा’ असा असून, हा प्रशस्त मार्ग पूर्वी महाराष्ट्र व कर्नाटकातील जुन्या संस्थानांना जोडणाऱ्या रामघाटाकडे जात होता. गोव्यातील डिचोलीतील साळ, लाटेबार्से मार्गे कसई गावात आल्यानंतर, जेथे चार रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी, आसुरी शक्तीची वक्रदृष्टी टाळण्यासाठी आणि वाटसरूंना सावलीसाठी पिंपळाचे रोप लावण्यात आले.
काळाच्या ओघात हे रोप आज प्रचंड, हिरवेगार, दिव्यतेने नटलेले पिंपळाचे झाड बनले आहे. भाविकांच्या श्रद्धा आणि अनुभवामुळे ते ‘पिंपळेश्वर’ म्हणून ओळखले जाऊ लागले असून, आज ते परिसराचे धार्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा असलेले सजीव संचित ठरले आहे.
राखीमात्र – निसर्गाशी नातं जपण्याचा आगळावेगळा उपक्रम
याच पिंपळेश्वर वृक्षाशी निसर्गबंध दृढ करण्यासाठी सरकारी प्राथमिक विद्यालय, पुनर्वसन-साळ येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी “राखीमात्र – निसर्गाशी नातं जपण्याचा एक प्रयत्न” हा उपक्रम राबवला.
हा उपक्रम परिसर अभ्यास शिक्षक संकेत नाईक यांच्या संकल्पनेतून आणि प्रभारी मुख्याध्यापक धाकटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाला. वनश्री फाउंडेशन, सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय सावंत यांनी यासाठी मार्गदर्शन केले.नगरसेवक नितीन मणेरीकर, पालक रामचंद्र मळगावकर, शालेय सहाय्यक संयम नाईक उपस्थित होते.
रक्षाबंधनाचे औचित्य साधून वृक्षांविषयी कृतज्ञता घेऊन विद्यार्थ्यांनी पिंपळेश्वर वृक्षाला राखी बांधली. या कृतीतून वृक्षप्रेम, संस्कृती आणि पर्यावरणसंवर्धनाचा संदेश स्थानिकापर्यत पोहोचला.
वारसा आणि आधुनिकतेचा मेळ
प्रमुख पाहुणे कसई-दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पिंपळ, वड, आंबा, रूमड यांसारख्या वृक्षांचे देवत्व आणि पर्यावरणीय महत्त्व स्पष्ट केले. प्राणवायू, सावली, निवारा, फळफूल अशा देणग्यांची जाण ठेवून वृक्षसंवर्धन गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सदर उपक्रमामार्फत कसई दोडामार्ग नगरपंचायत तर्फे शाळेतील हरएक विद्यार्थाला सागवान झाड दिले.
या उपक्रमात विशेष आकर्षण ठरला QR कोड फलक. हा कोड स्कॅन करून ‘पिंपळेश्वर’ वृक्षाचा इतिहास, धार्मिक महत्त्व आणि पर्यावरणीय माहिती मोबाईलवर पाहता येईल. स्थानिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा हा अभिनव संगम उपस्थितांना भावला. QR कोड मधिल फाईल पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी पिंपळेश्वराचे महत्त्व शब्दबद्ध केले आहे.
संवर्धनाचा संदेश पुढील पिढ्यांपर्यंत
मान्यवरांनी निसर्गाशी असलेले नाते जपण्याचे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद पर्यावरण जागृती फौज, गोवा, पिंपळेश्वर देवस्थान-दोडामार्ग आणि वनश्री फाउंडेशन-सिंधुदुर्ग यांनी सहकार्य केले.