विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची गरज : अविनाश सावंत

Edited by:
Published on: January 09, 2024 14:03 PM
views 105  views

देवगड : आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना भविष्यात उज्वल यश प्राप्त करावयाचे असेल तर त्यांनी स्पर्धा परीक्षांना प्रविष्ट व्हावे व या परीक्षांचा जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करून यामध्ये उज्वल यश प्राप्त करावे तरच आजच्या विद्यार्थ्याला स्पर्धेच्या युगात टिकता येईल असे मत तळेबाजार येथील स्टेट बँकेचे शाखाधिकारी आणि देवगड तालुका मराठा समाजाचे खजिनदार अविनाश सावंत यांनी देवगड येथे व्यक्त केले. देवगड तालुका मराठा समाज व शुभारंभ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष संदीप साटम, कार्यवाह केदार सावंत, विजय कदम, किसन सूर्यवंशी, योगेश राणे, सूर्यकांत पाळेकर, अजित राणे, शुभारंभ अकॅडमीचे संचालक सुरज चक्रवर्ती, सौ.साराह चक्रवर्ती,शेखर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

सावंत पुढे म्हणाले देवगड तालुक्याचा शैक्षणिक दृष्टिकोनातून संख्यात्मक व गुणात्मक विकास व्हावा   यासाठी विद्यार्थ्यांनी मराठा समाजाने आयोजित केलेल्या अशा प्रकारच्या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा व आपले करिअर करावे यासाठी विशेष मेहनत घ्यावी तरच आपली शैक्षणिक प्रगती होईल.

याप्रसंगी अध्यक्ष संदीप साटम यांनी शुभारंभ अकॅडमी ने देवगड तालुक्यामध्ये आपली शाखा सुरू करावी यासाठी समाजातर्फे सहकार्य केले जाईल तसेच ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी काही सहकार्य लागल्यास समाज करू शकेल याची ग्वाही दिली. या मार्गदर्शन वर्गात सुरज चक्रवर्ती यांनी इंग्रजी सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची माहिती अभ्यास कसा करावा? याबाबतचे मार्गदर्शन केले हा मार्गदर्शन वर्ग मराठा समाजाने विनामूल्य घेतलेला होता या वर्गास देवगड, जामसंडे, वाडा ,इंग्लिश मीडियम, तळेबाजार, शिरगाव या हायस्कूल मधील 132 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मिलिंद माने ,दया पाटील, प्रवीण सावंत, प्रवीण वातकर, पंकज दुखंडे, पप्पू कदम तसेच अनेक मराठा बांधवांनी विशेष मेहनत घेतली याप्रसंगी पालकांच्या वतीने संदीप कुलकर्णी आणि श्री ठाकूर यांनी मराठा समाजाने आयोजित केलेल्या उपक्रमाबाबत आपल्या मनोगतातून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी केले.