
चिपळूण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित श्री. आनंदराव पवार महाविद्यालय, चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी घटना घडली आहे. महाविद्यालयातील इयत्ता अकरावी (सायन्स)ची विद्यार्थीनी कुमारी वेदिका विष्णू हरवडे हिला, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात ध्वजारोहण करण्याचा सन्मान लाभला.
वेदिकाने हा मान आपल्या वक्तृत्वकौशल्याच्या जोरावर पटकावला. १ ऑगस्ट रोजी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तिने प्रभावी आणि सशक्त मांडणी करत प्रथम क्रमांक मिळवला होता. या उल्लेखनीय यशाची दखल घेत वाचन मंदिर समितीने तिला स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्याचा मान बहाल केला. या स्पर्धेसाठी प्रा. भालेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले होते.
गोवळकोट येथील रहिवासी असलेली वेदिका हरवडे ही अत्यंत गुणी आणि जिद्दी विद्यार्थिनी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणात सातत्य ठेवत हायस्कूलमध्ये दहावीला ८७.२० टक्के गुण मिळवत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. वक्तृत्वकलेसोबतच तिला गायनाचीही विशेष आवड असून, ती विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांत नेहमीच आघाडीवर असते.
वेदिकाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणा सोमण, प्राचार्य भाऊ कांबळे, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच संस्थेचे पदाधिकारी रजिस्टर खेडेकर, पी.आर.ओ. चोगले यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उदय गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लेश लकेश्री, खजिनदार सिद्धेश लाड यांनी समाधान व्यक्त करत, “वेदिकाचे यश हे संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे”, असे गौरवोद्गार काढले.
देशभक्तीच्या वातावरणात, आपल्या कर्तृत्वाने मानाचा झेंडा उंचावणाऱ्या वेदिकाने सर्व विद्यार्थी वर्गास प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.