
वेंगुर्ले : गुणी विद्यार्थ्यांना समाजाकडून मिळणारा सन्मान त्यांना यशाकडे नेणाऱ्या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरतो. भंडारी समाजातील विद्यार्थी आपले भविष्य घडवताना समाजाच्या आशा-अपेक्षांचे प्रतीक बनावेत, हीच या कार्यक्रमामागची भूमिका असल्याचे प्रतिपादन ऍड श्याम गोडकर यांनी वेंगुर्ले येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचा वार्षिक विद्यार्थी गुणवंत सन्मान सोहळा रविवारी (२९ जून) मोठ्या उत्साहात साई डिलक्स सभागृह, वेंगुर्ला येथे पार पडला. मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्याम गोडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन सातार्डा येथील प्रसिद्ध उद्योजक योगेश मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. श्याम गोडकर होते, तर व्यासपीठावर मुंबईतील यशस्वी उद्योजक भाऊ आंदुर्लेकर, रमण वायंगणकर, उपाध्यक्षा वृंदा कांबळी, सुरेश बोवलेकर तसेच मंडळाचे सर्व संचालक उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात अॅड. श्याम गोडकर यांना भारत सरकारकडून नुकतीच प्राप्त झालेली नोटरी पदवी ही महत्त्वपूर्ण कायदेशीर उपलब्धी म्हणून मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन रमण वायंगणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याचवेळी समाजहितासाठी मोलाची भूमिका बजावणारे उद्योजक योगेश मांजरेकर व भाऊ आंदुर्लेकर यांचाही अॅड. गोडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात वेंगुर्ला तालुक्यातील विविध शाळांतील दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, पुस्तक भेट, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विशेष गौरव मातोश्री पार्वती देवी इंग्लिश माध्यम विद्यालयाच्या कु. शमिका तळवणेकर हिचा करण्यात आला. तिने वेंगुर्ला तालुक्यात दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला.
योगेश मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’ हे प्रेरणादायी आत्मचरित्रात्मक पुस्तक भेट दिले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश दिला. प्रमुख पाहुणे भाऊ आंदुर्लेकर यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, "भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ समाज उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असून, यापुढेही आमचा आर्थिक पाठिंबा या मंडळाला राहणार आहे. शिक्षण, सन्मान आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाज उभारण्याचे हे कार्य उल्लेखनीय आहे."
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अॅड. गोडकर यांनी मंडळाच्या गेल्या ४५ वर्षांतील कार्याचा आढावा घेतला. "१९७८ पासून मंडळाने तालुका व जिल्हा मेळावे, वधुवर परिचय मेळावे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे यशस्वीरित्या पार पाडली आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा मंडळाच्या समाजविकास दृष्टिकोनाचा अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांनी आपली आवड ओळखून अधिकारी वा उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा, हीच आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद बांदेकर यांनी केले, तर संयोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सचिन परुळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद केरकर, विकास वैद्य, दीपक कोचरेकर, गजानन गोलतकर, डॉ. जी. पी. धुरी, श्रेया मांजरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.