'शक्तिपीठ'ला बांद्यात कडाडून विरोध !

ग्रामसभेत विरोधाचा एकमुखी ठराव
Edited by: विनायक गांवस
Published on: May 03, 2025 11:48 AM
views 156  views

सावंतवाडी : बहुचर्चित शक्तिपीठ मार्गाला सिंधुदुर्गत विरोध होत असताना ज्या सावंतवाडी मतदारसंघातून हा रस्ता जातो तेथील स्थानिक आमदार, माजी मंत्री दीपक केसरकर यांनी या महामार्गाला ठाम पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या बांदा ग्रामपंचायतीकडून विशेष ग्रामसभेत या महामार्गाविरोधात एकमुखी विरोधाचा ठराव घेण्यात आला आहे. यामुळे शक्तिपीठचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.

मुंबई-गोवा महामार्ग बांदा येथून गेल्यानंतर अनेक वेळा बांद्यात पुरपरीस्थिती निर्माण झाली. प्रशासनानं येथील पाऊस, पाण्याचा अंदाज न घेतल्यानं व खबरदारी न राखल्यान ही परिस्थिती ओढावली‌. बांद्यासह शेर्ले, वाफोलीसह लगतच्या गावातील ग्रामस्थांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण होत आहे. यातच आता बांदा शहरातून नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. त्यामुळे बांद्याच्या विशेष ग्रामसभेत या विरोधात एकमुखी ठराव घेण्यात आला. बांदा बाजारपेठ ही विस्थापित होणार असून बाधित शेतकरी हे भूमिहीन व अल्पभूधारक होणार असल्याने या महामार्गाला सभेत तीव्र विरोध करण्यात आला. 

महामार्गाच्या विरोधात प्रशासनाशी लढण्यासाठी महामार्ग विरोधी कृती समितीची स्थापना यावेळी करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच प्रियांका नाईक यांची निवड करण्यात आली असून समितीच्या माध्यमातून लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सह्यांची मोहीम राबवून स्थानिकांचा या महामार्गाला विरोध असल्याबाबत निवेदन देण्याचा ठराव घेण्यात आला. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी शक्तिपीठ महामार्गाला समर्थन दिल्याने त्याचे पडसाद या विशेष ग्रामसभेत उमटले. उपसरपंच राजाराम ऊर्फ आबा धारगळकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजाराम ऊर्फ बाळू सावंत, जावेद खतीब, प्रशांत बांदेकर, शामसुंदर मांजरेकर, साई काणेकर, रत्नाकर आगलावे, अनुजा वराडकर, दीपलक्ष्मी सावंत, शिल्पा परब, देवल येडवे, रिया येडवे, ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये, तलाठी फिरोज खान, वनपाल प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला उपसरपंच धारगळकर यांनी शक्तिपीठ महामार्गसाठी शहरातून जाणाऱ्या सर्वे नंबरचे वाचन केले. शहरातील एकूण ५८ सर्वे नंबर असल्याची माहिती त्यांनी दिली. शक्तिपीठ महामार्गमुळे बांदा बाजारपेठे पूर्णपणे विस्थापित होण्याचा मुद्दा गुरुनाथ सावंत यांनी उपस्थित केला. हा महामार्ग शहरातून न नेता पर्यायी मार्गानं स्थानिकांना विश्वासात घेऊन न्यावा. या महामार्गला आमचा विरोध नसून स्थानिक शेतकरी यामुळे विस्थापित होणार असतील तर आमचा तीव्र विरोध राहील असे त्यांनी सांगितले. बाधित शेतकरी अरुण मोर्ये यांनी याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने आपली भूमिका जाहीर करावी. आपल्यासोबत आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत. याबाबत कृती समिती तयार करून त्याचे नेतृत्व सरपंच व ग्रामपंचायत लोकप्रतिनिधिनी करावे, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी कृती संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी सरपंच प्रियांका नाईक यांची निवड करण्यात आली. या समितीत उपसरपंच आबा धारगळकर, सर्व १५ ग्रामपंचायत सदस्य व बाधित शेतकरी प्रमोद कामत, राजेश विरनोडकर, अरुण मोयें, अभय देसाई, प्रसाद गायतोंडे, आनंद गवस, ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत, शामू धुरी, रामचंद्र वाळके, गजानन गायतोंडे, आनंद सावंत, रवी गवस, अवी पंडित, आपा चिंदरकर, राजेंद्र महाजन, विजय बांदेकर, राजू हडफडकर, प्रशांत सुटणकर, महेंद्र परब, भरत दळवी, नागेश सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.