संघटना वाढीसाठी प्रयत्न करा | मुख्यमंत्र्यांचे आदेश : संजय आंग्रे

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 23, 2023 20:05 PM
views 45  views

कुडाळ : प्रत्येक गावात शाखा आणि प्रत्येक घरात शिवसेना वाढलीच पाहिजे, पक्ष वाढीसाठी कामाला लागा, विकास कामांना लागणारा निधी दिला जाईल त्याची काळजी करू नका, संघटना वाढीसाठी प्रयत्न करा असे आदेश आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अशी माहिती शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे यांनी दिली 

यावेळी बोलताना संजय आंग्रे यांनी सांगितले की, येत्या 4 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, पाणी व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील हेही उपस्थित राहणार आहेत यावेळी, जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची आढावा बैठक घेतली जाणार आहे, व जिल्हाच्या विकासाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक होणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विधानसभा प्रमुख संदेश सावंत पटेल, जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे,  तालुका प्रमुख योगेश तुळसकर, महिला तालुका प्रमुख सिद्धी शिरसाठ, अनघा रांगणेकर, रुपेश पावसकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तत्कालीन ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष यांचा शिवसेना शिंदे गटात बुधवारी प्रवेश घेण्यात आला होता, याच पार्श्वभूमीवर रुपेश पावसकर यांचे शिवसेना कार्यालय कुडाळ येथे स्वागत करण्यात आले. यावेळी रुपेश पावसकर यांचं शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे यांनी स्वागत केले. तर येणाऱ्या काळात रुपेश पावस्कर यांच्यावर जिल्ह्याची मोठी जबाबदारी दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.

तर यावेळी पत्रकारांशी बोलताना रुपेश पावस्कर म्हणाले, आम्ही बाळासाहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात असलेल्या ओबीसी जिल्हाध्यक्षालाच वरिष्ठ विश्वासात घेत नव्हते, त्यात पक्षांतर्गत असलेली गटबाजी, व परस्पर निर्णय घेणे, या सर्वांना कंटाळून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी गावागावात घराघरात शिवसेना वाढवण्याचे आदेश दिले आहेत अनुषंगाने काम करेन असे रुपेश पावस्कर यांनी सांगत माझा पक्ष प्रवेश हा जिल्हा परिषदेची नांदी नसून शिवसेना पक्षाची नांदी आहे असेही सांगितले.

यावेळी रुपेश पावसकर यांचे समर्थक नरेंद्र नेरुरकर यांचा पक्षप्रवेश घेण्यात आला. तर किशोर सावंत यांचा पक्ष प्रवेश घेत नेरुर विभाग प्रमुख पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. तर भडगाव येथील योगेश बेलूशे यांना कडावल उपविभाग प्रमुख पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.