यशस्वी शिष्टाईनं उपोषण मागे

मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापनसाठी छेडल होत उपोषण
Edited by: संदीप देसाई
Published on: December 18, 2023 19:34 PM
views 65  views

दोडामार्ग : कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व जूनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या मुख्याध्यापकांची बदली करू नये तसेच अन्य विविध मागण्यांसाठी कुडासे ग्रामस्थांनी सोमवारी प्रशालेच्या पटांगणात बेमुदत उपोषण सुरु केलं होत. दरम्यान, संस्थेच्या पदाधिकारी यांनी उशिरा उपोषणस्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा करून यशस्वी तोडगा काढला. मुख्याध्यापक यांची नियमानुसार बदली झाली असून आता प्रभारी मुख्याध्यापक नियुक्ती करत असल्याचे आश्वासन दिलं. तर शाळा दुरुस्ती व इतर मागण्यांनाही संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान गोंधळी यांच्या नियुक्तीचीबाब न्यायप्रविष्ठ असल्याने त्याबाबत कोणतही आश्वासन देण्यात आलेलं नाही. मात्र, बहुतांश मागण्या संस्थेने सकारात्मक प्रतिसाद देत मार्गी लावल्याने उपोषण मागे घेतल्याची माहिती उपोषणकर्ते ग्रामस्थांनी दिली.

कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर प्रशालेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांची बदली करण्यात येऊ नये, बदली करण्याचे निश्चित असेल तर या पदावर नवीन मुख्याध्यापकांची तात्काळ नेमणूक करून मगच येथे कार्यरत मुख्याध्यापकांची बदली अन्यत्र करावी. विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता वाढ करताना शिक्षक कायमस्वरूपी असावेत. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत विज्ञान व गणित विषयांच्या शिक्षकांची नेमणूकही करण्यात यावी. अकरावी व बारावीच्या प्राध्यापकांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी तसेच विज्ञानचे तिन्ही शिक्षक विषयानुरूप पदवीधारक असावे या प्रमुख मागण्यांसह शाळा इमारत दुरुस्ती, खिडक्या, दरवाजे व रंगकाम करण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तर या प्रशाळेत कार्यरत असलेले शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक श्री. गोंधळी यांची येथील सेवेचा विचार करून त्यांना सेवेत सामावून घ्यावे या सर्व मागण्यांसाठी कुडासे ग्रामस्थांनी सोमवारी सकाळपासून या प्रशालेच्या पटांगणात बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. यावेळी सरपंच पूजा बाबाजी देसाई, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष पूजा दत्तप्रसाद देसाई, उपसरपंच आत्माराम देसाई, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद कुडास्कर, राजाराम देसाई, संतोष देसाई, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संजय धुरी, नरेश गवस व मोठ्या संख्येने ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाले होते.