अंमली पदार्थ रोखण्यासाठी कडक तपासणी करा !

निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांचे निर्देश
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 27, 2022 15:55 PM
views 238  views

सिंधुदुर्गनगरी : अंमली पदार्थ वाहतूक, विक्री प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यामध्ये चेक पोस्ट, सागरी मार्ग प्रवेश याठिकाणी तपासण्या कराव्यात. अंमली पदार्थ सेवन व विक्री करणाऱ्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिले. 


जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को  कोऑर्डिनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची एकत्रित बैठक निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक संदीप भोसले, अन्न औषध प्रशासनचे सहायक आयुक्त मिलींद पाटील, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक अमित पाडळकर, कोस्टगार्ड रत्नागिरी विभागाचे जितेंद्रकुमार अधिकारी, सावंतवाडी वनविभागाचे एस.बी. सोनवडेकर, उपविभागीय कार्यालय कुडाळचे नायब तहसिलदार प्रदीप पवार, उपविभागीय कार्यालय सावंतवाडीचे नायब तहसिलदार संतोष बांदेकर, जि.प.समाजकल्याण विभागाचे निलेश कांबळे यावेळी उपस्थित होते.


स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक संदीप भोसले यांनी अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीबाबत गृह विभाग व सर्व संबंधित विभागाव्दारे सुरु असलेल्या कामाची माहिती सादर केली.


श्री. भडकवाड पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये सध्या ई-पिक पहाणी ॲपवर पीक नोंदणीचे काम सुरु आहे. ई-पीक नोंदणी करताना गांजा लागवड झाली असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी तात्काळ यंत्रणांना कळवावे. अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्पपरिणामांची माहिती व्हावी, यासाठी शाळा- महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात यावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अंमली पदार्थ सेवन व विक्री होत असल्यास संबंधित विभागांनी योग्य कारवाई करण्याबाबत दक्षता घ्यावी.