
मालवण : मालवण दांडी किनाऱ्यावर गेले दोन तीन महिने पोटाला दोरी बांधल्याने जखमी अवस्थेत फिरणाऱ्या एका भटक्या कुत्रीला जालना येथील पर्यटक सचिन राठोड यांच्या जागरूकतेतून आणि माध्यमातून आचरा येथील प्राणीप्रेमी संकेत चव्हाण यांनी त्या दोरीतून मुक्त करत जीवदान दिले आहे.
मालवण दांडी किनाऱ्यावर एका भटक्या कुत्रीच्या पोटाला नायलॉनची जाड दोरी बांधली गेली होती. ही दोरी कोणी बांधली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. परंतु स्थानिक माहितीनुसार ही कुत्री दोन ते तीन महिने अशीच दोरी बांधून दांडी किनाऱ्यावर फिरत होती. पाच दिवसापूर्वी जालना येथील सचीन राठोड हे पर्यटक मालवण दांडीकिनाऱ्यावर वास्तव्यास असताना त्यांनी या कुत्रीला पाहून ती दोरी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना अपयश आले. त्याच बरोबर त्यांनी स्थानिक आणि प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क करून मदतीसाठी आवाहन केले. मात्र त्यांची निराशा झाली. त्यामुळे राठोड यांज व्हाट्सअँप, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया वरून मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मालवण तालुक्यातील आचरा येथील संकेत चव्हाण यांनी पुढाकार घेत दांडी किनारा गाठून या कुत्रीची दोरी काढून मुक्तता केली.
सचिन राठोड व संकेत चव्हाण यांच्या या कार्याचे प्राणीप्रेमींकडून कौतुक होत आहे. मात्र, किनाऱ्यावर त्या कुत्रीला नेहमी पाहणारे खूप होते, पण तीची जीवघेण्या दोरीतून सुटका करणारे दोघेच होते, अशी खंतही व्यक्त केली जात आहे.