उत्पन्नाच्या अर्जांची तुफान विक्री...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 01, 2024 13:40 PM
views 564  views

कणकवली : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यामुळे कणकवली तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र व तहसील आवारातील झेरॉक्स सेंटर मधून सोमवारी सकाळपासून हजारोंच्या संख्येने  उत्पन्न दाखल्याच्या अर्जांची विक्री झाल्याची माहिती पुढे येत आहे. आजच्या एका दिवसात एवढे दाखले विकले गेले तर पुढील पंधरा दिवसात आणखीन मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होणार असल्याने प्रशासनावर ताण येण्याची शक्यता आहे.


आज  योजनेचा लाभ घेण्यासाठी कणकवली तहसील कार्यालयामध्ये बऱ्याच महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्पन्न दाखल्यासाठी आणि झेरॉक्स साठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले या योजनेसाठी प्रामुख्याने उत्पन्नाचा दाखला लागतो. आणि तो काढण्यासाठी गाव पातळीवर ग्रामपंचायत पोलीस पाटील यांच्या रहिवाशी दाखल्याची गरज असते तसेच शहरात नगरपंचायत रहिवासी दाखला देखील लागतो त्यामुळे सर्वच लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय आज या योजनेचा फायदा घेण्यासाठी दाखले गोळा करण्याच्या धावपळीत दिसून येत होती.