
सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव व धाकोरे या दोन गावात सद्द्य:स्थितीत तब्बल दहा ते पंधरा अनधिकृत चिरे उत्खनन होत आहे. त्यामुळे परिसरात प्रदूषण होत आहे. त्यामुळे निसर्गसंपन्न गावात सुरू असलेली हा चोरटा प्रकार तात्काळ थांबवा अशी मागणी तेथिल ग्रामस्थ बाळकृष्ण हळदणकर यांनी सावंतवाडी तहसिलदारांकडे केली आहे.
आजगाव परिसरात चुकीच्या पध्दतीने सुरू असलेल्या या खाणींवर दंडात्मक कारवाई करा अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा सुध्दा नागरिकांनी दिला आहे.
याबाबत हळदणकर यांनी तहसीलदार अरुण उंडे यांना दिलेले निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की, आजगाव व धाकोरे ही दोन्ही गावे फळबागायत व निसर्गसंपन्न आहेत. गावातील लोकांची रोजीरोटी याच फळबागायती शेतीवर अवलंबून आहे. गेल्या काही महीन्यांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अहोरात्र चिरेखाण व्यायसाय सुरू आहे. तब्बल दहा ते पंधरा ठीकाणी उत्खनन होत आहे. त्यामुळे येणार्या हंगामात त्याचा फटका फळझाडांना बसू शकतो.
त्यामुळे अशा प्रकारे चिरेखाणी सुरू राहिल्यास जैवविविधतेलाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे, त्यामुळे याची गंभीर दखल घेवून प्रत्यक्ष पाहणी करावी आणि संबधित चिरेखाणी तात्काळ बंद करावीत, अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे.