
सावंतवाडी : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन करमळी पर्यंत धावणाऱ्या ०११५१/५२ स्पेशल ट्रेनला सावंतवाडी रेल्वे स्थानकात थांबा मिळावा, यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटना तसेचं कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी यांनी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
या निवेदनातून त्यांनी सुट्टीच्या हंगामात कोकणात येणाऱ्या प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता विशेष रेल्वे गाड्यांना सावंतवाडीसह वीर, विलवडे, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड स्थानकात थांबा मिळण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावा अशी विनंती कोकण रेल्वेला करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन कोकण रेल्वे कडून अधिकृतपणे वीर, वैभववाडी रोड, सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकांवर ०११५१/५२ मुंबई - करमळी स्पेशल गाडीला थांबा देण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. या स्पेशल ट्रेनच्या थांब्यासाठी आरआरएम रत्नागिरी शैलेश बापट यांनी कोकण रेल्वेतर्फे मोलाचे प्रयत्न केले. त्यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे आभार मानण्यात आले.