सागर रक्षकांना सक्षम करण्यासाठी वेंगुर्ला पोलीस ठाण्याने उचललेली पाऊले कौतुकास्पद ; विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांचे गौरवोद्गार

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या कामाचे केले कौतुक
Edited by: दिपेश परब
Published on: March 28, 2023 22:06 PM
views 368  views

वेंगुर्ले: 

वेंगुर्ला तालुक्याला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. अनेक देश विदेशातील पर्यटक याठिकाणी भेटी देतात. यामुळे समुद्र किनारे सक्षम होण्यासाठी सागर रक्षक सक्षम होणे गरजेचे आहे. पूर्वी सागरी मार्गाने बरेच आतंकवादी हल्ले झाले आहेत. आणि यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. या सागर रक्षकांना सक्षम करण्यासाठी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी उचललेली पाऊले कौतुकास्पद आहेत. तसेच वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे काम अंतर्गत व बाह्य दृष्ट्या उत्कृष्ट असल्याचे गौरवोद्गार कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी वेंगुर्ले येथे काढले. 


   कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी मंगळवारी (२८ मार्च)  वेंगुर्ले पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचे वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या पोलीसांतर्फे पोलीस निरीक्षक अतुल जाधव व पोलीस टीमने सलामी देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचेसमवेत वेंगुर्ले पोलीस स्टेशन मधील सर्व विभागांची बीट अंमलदार कक्ष, सी.सी.टी.व्ही. लावण्यात आलेली स्क्रीन, नागरिकांना मार्गदर्शन व माहिती अंतर्गत लावण्यात आलेली भित्तीचित्रे तसेच फलक आणि पोलीस स्टेशनच्या बाहेरील परीसर व भित्तिचित्रे आदींची पाहणी केली.


   त्यानंतर वेंगुर्ले पोलीस स्टेशन मधील सर्व अंमलदार दर्जाच्या पोलिसांना मार्गदर्शन केले. महानिरीक्षक प्रवीण पवार यांचे वेंगुर्ले पोलीस स्टेशन मध्ये आगमन होताच त्यांचे वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सर्वप्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच त्यांचे सोबत वेंगुर्ले पोलीस स्टेशन येथे आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, सदस्य भरत सातोस्कर, योगेश तांडेल, मॅक्सी कार्डोज यांनी, वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीच्या सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव व वेंगुर्ले नगरपरिषरीषदेच्या माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ. सुकन्या नरसुले, शिवसेनेच्या माजी पदाधिकारी सौ. मंजुषा आरोलकर, शितल साळगांवकर, शबाना शेख यांनी, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शांतता समितीचे सदस्य श्रीनिवास गावडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश परब, जयराम वायंगणकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


समुद्र किनारा सक्षम होण्याच्या दृष्टीने येथील सागर रक्षकांना पोलिसांचे चिन्ह असलेले टीशर्ट याचे वाटप वेंगुर्ला पोलीस ठाण्यामार्फत पोलीस महासंचालक प्रवीण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सागर रक्षक हे पोलिसांचे सहकारी आहेत हे नागरिकांना लक्षात यावे व सागर रक्षकांना नागरिकांना विविध सूचना देताना सोपे जावे या उद्देशाने ७० सागर रक्षकांना हे टीशर्ट वाटप करण्यात आले. दरम्यान जी गावे समुद्र किनाऱ्याला आहेत त्या गावांना भेटी देऊन जास्तीत जास्त सागर रक्षक नेमण्याचा दृष्टीने प्रयत्न केले जातील असे यावेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले.