
सावंतवाडी : सिंधुदुर्गची लाल माती ही अनेक नररत्नांची खाण आहे. त्यातील एक मुकुटमणी म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. 'दर्पण' या प्रथम मराठी साप्ताहिकातून त्यांनी उठविलेला आवाज आज बुलंद करण्यासाठी सर्व पत्रकारांनी पत्रकारितेची गनिमा जपणे आवश्यक आहे. त्यासाठी सत्य आणि तत्व यांच्याशी निष्ठा राखणे देखील गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा 'व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग'चे सल्लागार सीताराम गावडे यांनी केले. 'व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग'तर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. गावडे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सचिव शैलेश मयेकर, कार्याध्यक्ष अनंत धोंड, सहसचिव संजय पिळणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत, प्रसिद्धी प्रमुख कवी दीपक पटेकर तसेच पत्रकार प्रशांत मोरजकर नाना धोंड, साबाजी परब, आशिष धोंड, श्रीरंग सावंत आदी उपस्थित होते.
प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर 'व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग'कडून उपस्थित पत्रकारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सीताराम गावडे पुढे म्हणाले, पाश्चात्य देशातून आलेले चरस व गांजा यांसारखी विषारी द्रव्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्यामुळे येथील तरुणाई बर्बाद होत आहे. हे रोखण्यासाठी सर्व पत्रकारांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवणे गरजेचे आहे. समाजाला दिशा देण्याचे काम सर्वांनी आतापर्यंत केले आहे तेच पुढे न्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील म्हणाले, पत्रकारांची एकजूट ही फार महत्त्वाची आहे. 'एकत्र तर सर्वत्र' हे ब्रीद घेऊन सातत्याने 'व्हॉईस ऑफ मीडिया' शासन आणि प्रशासनाला पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी जाब विचारत आहे. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सरांच्या विविध संकल्पनेतून आज ५६ पेक्षा अधिक देशांमध्ये संघटना पोहोचली आहे. त्याचा आपण सर्व बांधव भाग असणे अत्यंत अभिमानाचे असल्याचे श्री. पाटील यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश मयेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.










