राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला ?

चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक बाबी समोर
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 26, 2024 15:14 PM
views 173  views

मालवण : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या नंतर शिवप्रेमी आक्रमक बनले होते. विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. राणे समर्थक आणि ठाकरे गट आमने-सामने आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आता आपला १६ पानी अहवाल सादर केला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 


मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. त्यानंतर मोठा गदारोळ झाल्याचे पहावयास मिळाले. ह्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे यालाही पोलिसांनी अटक केली. ह्या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला १६ पानी अहवाल सादर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्याचे डिझाईन योग्य पद्धतीने तयार करण्यात आलेले नव्हते याचा उल्लेख या अहवालामध्ये करण्यात आला आहे.


भारतीय नौदलाचा वीस वर्षाहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्राध्यापक जांगिड, प्राध्यापक परीदा यांचा समावेश होता.

शिवरायांचा पुतळा कोसळण्याचे मुख्य कारण या समितीने अहवालात नमूद केले आहे की गंज आणि कमकुवत फ्रेम मुळे पस्तीस फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे.

 छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आले नाही हे मुख्य कारण समोर आले आहे. पुतळ्याची देखाभाल योग्य पद्धतीने झाली नाही यामुळे पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता. यामध्ये प्रामुख्याने पुतळ्याला योग्य पद्धतीने वेल्डिंग करण्यात आले नव्हते. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यात आला होता त्याचे डिझाईन योग्य पद्धतीने तयार करण्यात आले नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याकडे हा अहवाल देण्यात आला असून यातील प्रमुख कारण आता समोर आले आहे. पुतळा पडण्याची अनेक कारणे तज्ञ मंडळींनी नमूद केली आहेत.