छत्रपती शिवरायांचा हा घोर अपमान : जावेद शेख

Edited by: विनायक गांवस
Published on: August 31, 2024 06:46 AM
views 205  views

सावंतवाडी : अखंड भारताचे दैवत असणाऱ्या, बारा बलुतेदार अन् अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या, आपल्या सर्वांचेच दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा हा घोर अपमान असून या घटनेची सखोल चौकशी करून छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू जावेद शेख यांनी सांगितले.


मल्लसम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असलेले जावेद शेख यांनी 'सत्यार्थ महाराष्ट्र'जवळ राजकोट पुतळा कोसळलेल्या प्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.श्री. शेख पुढे म्हणाले, छत्रपती शिवराय म्हणजे संपूर्ण जगाला मानवता शिकवणारे एक महान प्रतिबिंब आहेत. आजपर्यंत छत्रपतींचा असा अवमान कधीही झाला नाही. ज्या स्वराज्यामध्ये गड किल्ल्यांची निर्मिती केली, अनेक जाती - धर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. त्याच महान परंपरा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात महाराजांचा पुतळा कोसळणे ही गोष्ट लाजिरवाणी बाब आहे. म्हणून या घटनेचा निषेध व्यक्त करावा तो कमीच आहे. मात्र असा घोर अवमान करणाऱ्याला अजिबात क्षमा करता कामा नये, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा जावेद शेख यांनी यावेळी व्यक्त केली.