15 फुटी अश्वारूढ पुतळा घेऊन संभाजीनगरातून पोचले मालवणात !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 29, 2024 09:50 AM
views 1044  views

मालवण : राजकोट किल्ला येथील छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा या संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते काल रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पंधरा फुटी अश्वारूढ पुतळा घेऊन मालवणात दाखल झाले. प्रशासनाला याची माहिती मिळताच तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून पुतळा उभारण्यास प्रशासनाची परवानगी मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही माघारी परता असे आवाहन केले. त्यानुसार रात्री पोलीस बंदोबस्तात हा पुतळा मालवणातून रवाना करण्यात आला.

दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री तहसीलदार यांना निवेदन देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

राजकोट किल्ला येथील महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या घटनेची प्रसारमाध्यम, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर काल रात्री संभाजीनगर येथून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ट्रकमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा घेऊन मालवणात दाखल झाले. ते शहरातील वायरी येथे आले असल्याची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमी, भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर हे दाखल झाले. त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसही वायरी येथे दाखल झाले. त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुतळा असलेल्या ट्रॅकसह पोलीस ठाण्यात येत माहिती देण्यास सांगितले. त्यानुसार संघटनेचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. 

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वर्षा झालटे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे हेही दाखल झाले. तहसील कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष बाळराजे आवारे यांच्याशी तहसीलदार झालटे यांनी चर्चा केली. यावेळी तहसीलदारांनी संघटनेच्या पदाधिकऱ्यांना तुम्ही येथे पुतळा घेऊन येण्यापूर्वी प्रशासनाशी संपर्क साधणे गरजेचे होते. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. मात्र सध्याची परिस्थिती ही वेगळी असल्याने तसेच या प्रकरणाची चौकशीची प्रक्रिया सुरू होणार असल्याने तुम्हाला महाराजांचा पुतळा उभारण्याची परवानगी प्रशासनाकडून देता येणार नाही. त्यामुळे तुम्ही या पुतळ्यासह माघारी परतावे असे स्पष्ट केले. 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री. आवारे यांनी राजकोट किल्ल्यातील महाराजांचे स्मारक कोसळल्याच्या बातम्या व सोशल मीडियावर फोटो पाहिल्यावर शिवप्रेमी म्हणून आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे. या घटनेचे राजकारण न करता प्रशासनाला सहकार्य व महाराष्ट्राची अस्मिता या भावना जोपासून स्मारकाच्या जागी नवीन स्मारक बसविण्याची कार्यवाही होत नाही. तोपर्यंत हा अश्वारूढ पुतळा बसविण्याची आमची मागणी आहे. राज्यातील सर्व शिवप्रेमींना त्या जागेवर पुन्हा एकदा महाराजांचे स्मारक व्हावे अशी इच्छा आहे. त्या भावनेचा सन्मान राखण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे असे सांगितले. यावर तहसीलदार झालटे यांनी प्रशासनाकडून अशी परवानगी देता येणार नाही असे स्पष्ट करत तुम्ही माघारी परतावे असे सांगितले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात संघटनेने आणलेला पुतळा मालवणातून रवाना करण्याची कार्यवाही करण्यात आली.

यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस कर्मचारी सुशांत पवार, प्रतीक जाधव, सुहास पांचाळ, सुभाष शिवगण, संघटनेचे योगेश रासम, अक्षय चव्हाण, जालिंद जगताप, स्वप्नील वरावे, संभाजी आढाव, प्रवीण नागरे, शिवराज गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.