राजकोट किल्ल्यावर शिवपुतळा उभारण्यासाठी निविदा

6 महिन्यात पुन्हा पुतळा उभारणं शक्य ?
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 24, 2024 06:22 AM
views 345  views

मालवण : राजकोट किल्ला येथे नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया केलेली आहे. काम करण्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात आली आहे. 


मालवण राजकोट किल्ला येथे नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला शिव पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला होता. अनेक राजकीय नेत्यांनी पाहणी करत घटनेचा निषेधही नोंदवला होता. शिवपुतळा घाईगडबडीत उभारण्यात आल्याची टीकाही झाली होती. त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने नव्याने शिवपुतळा उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. अखेर राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. यासाठी सुमारे 20 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला आहे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. शिव पुतळा उभारण्यासाठी अनेक शिल्पकारांनी पुतळा उभण्यास किमान वर्षभर कालावधी अपेक्षित असल्याचे म्हटले होते. असे असतानाही या निविदे मध्ये कामाची मुदत सहा महिन्यांची देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.