सावंतवाडीतील समस्यांबाबत 'सामाजिक बांधिलकी' चे निवेदन

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 15, 2023 12:16 PM
views 126  views

सावंतवाडी : शहरातून आंबोलीकडे वळणाऱ्या रस्त्याची रुंदी वाढविण्यात यावी. त्या परिसरात बरीच गटारे उघड्या अवस्थेत असल्याने अपघात घडत आहेत. याबाबत तत्काळ उपयोजना करण्यात यावी, अशी 'मागणी 'सामाजिक बांधिलकी'च्या वतीने बांधकामकडे केली आहे. याबाबतचे निवेदन उपकार्यकारी अभियंता सीमा गोवेकर यांच्याकडे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, येथील वेंगुर्ले बस स्थानकासमोरील आंबोलीकडे वळणाऱ्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी रात्री उघड्या गटारात महिला तोल जाऊन मुलीसहित पडली. यात तिला गंभीर दुखापत झाली.

 'सामाजिक बांधिलकी'च्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार केले. अधूनमधून वृद्ध तसेच शाळकरी मुले देखील या उघड्या गटारात पडल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ही गटारे त्वरित बंद करण्यात यावीत. स्थानकावरू आंबोलीकडे वळणारा रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होतात. त्यामुळे संबंधित वळण काढून रस्ता रुंद करण्यात यावा. जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल. रस्ता रुंद करण्यासाठी बाजूला बांधकामची जागा आहे. याबरोबरच उघडे गटार बंद करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदन देवून केली आहे.

निवेदनावर माजी नगरसेवक संजय पेडणेकर, प्रा. सतीश बागवे, रवी जाधव व सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.