6 महिन्यांचं मानधन द्या, नाही तर कार्यमुक्त करा

कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षकांचं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 20, 2023 17:02 PM
views 178  views

सिंधुदुर्ग : मागील सहा महिन्याचे मानधन अदा करा, अन्यथा मानधन अदा न झाल्यास डिसेंबर 2023 पासून आम्हाला कार्यमुक्त करा अशी मागणी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र कदम, बाजीराव कांबळे पंढरीनाथ गोसावी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मे 2023 च्या अखेरीस जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभाग यांनी  सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली काही वर्ष कार्यरत असणाऱ्या परजिल्ह्यातील शिक्षकांना मागणीनुसार तत्काळ जिल्हा अंतर्गत बदल्या केल्यामुळे जून जुलैमध्ये शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. शिक्षकांविना शाळा बंद पडण्याची वेळ आली होती. तसेच यावेळी महाराष्ट्र शासनाकडून प्राथमिक शिक्षक भरती स्थगिती मिळाल्यामुळे पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. शासनाकडे प्राथमिक शिक्षकांच्या भरतीची मागणी ही केली जात होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांचे हंगामी कंत्राटी शिक्षक म्हणून रुपये 20 हजार मानधनावर नियुक्ती केली. या नियुक्तीला सत्ताधारी आणि  पदाधिकारी कार्यकर्ते, स्थानिक संघटना, पालक वर्ग सुशिक्षित बेरोजगार, यांचा तीव्र विरोध होता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हंगामी कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी शासनाला सहकार्य केले. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केलेल्या कंत्राटी शिक्षकांना जिल्हा परिषद फंडातून मानधन मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हंगामी कंत्राटी शिक्षकांना सर्व स्तरातून विरोध असतानाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी 14 जुलै 2023 रोजी यांचा आदेश क्र.4505 प्रमाणभूत मानून अध्यापनाचे कार्य सुरू ठेवले. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यातील हंगामी कंत्राटी शिक्षकांना मानधना विना वंचित रहावे लागत आहे. तरी कृपया निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नोव्हेंबर 2023 अखेर मानधन अदा करण्यात यावे अन्यथा मानधन अदा न केल्यास डिसेंबर 2023 पासून जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांना कार्यमुक्त करावे अशी मागणी कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

 कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत शासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप अनुदान प्राप्त नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांनी आम्हाला चर्चेदरम्यान सांगितले असल्याची माहिती कंत्राटी शिक्षक म्हणून काम करणारे सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.