
सावंतवाडी : राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्यसाधून नशाबंदी मंडळाच्या शाखा सिंधुदुर्गतर्फे रविवार २२ जानेवारीला सकाळी १० वा. वागदे येथील गोपुरी आश्रमच्या प्रशिक्षण केंद्र सभागृहात राज्यस्तरीय व्यसनमुक्ती काव्यस्पर्धा, काव्यसंमेलन, परिसंवाद होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा वैद्यकीय अधिकारी महेश खलिपे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जि. प. समाज कल्याण विभागाचे अधिकारी श्याम चव्हाण उपस्थित राहणार असून नशाबंदी मंडळाचे राज्य सरचिटणीस वर्षा विद्या विलास, संघटक अमोल माडामे, मनोविश्लेषक डॉ. रेश्मा भाईप, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, नशाबंदी मंडळाचे प्रचारक सुनील चव्हाण यांची विशेष उपस्थित असणार आहे.
उद्घाटनानंतर पत्रकार अॅड. ऋषिकेश पाटील यांच्या अध्यक्षेतखाली व्यसनमुक्तीवर परिसंवाद होणार आहे. यात 'व्यसनाधिनतेवर उपाययोजना' या विषयावर मुक्तांगण, पुण्याचे विभागप्रमुख तथा समुपदेशक डॉ. निहार हसबनीस मार्गदर्शन करतील. 'राजकीय भूमिकेतून व्यसनमुक्ती' या विषयावर कवी अमोल कदम मार्गदर्शन करतील. 'व्यसनाधिनतेचे सामाजिक परिणाम' या विषयावर पत्रकार, लेखक, कवी श्रेयश शिंदे मार्गदर्शन करतील. 'व्यसनमुक्तीसाठी कायद्याचा आधार' या विषयावर तालुका वकील संघटनेच्या उपाध्यक्षा अॅड. प्राजक्ता शिंदे मार्गदर्शन करतील. त्यानंतर अमोल कदम यांच्या अध्यक्षतेखाली व्यसनमुक्ती काव्य स्पर्धा व कवी संमेलन होईल.
तरी या विविध कार्यक्रमाचा जिल्हावासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या शाखा, सिंधुदुर्गच्या संघटक अर्पिता मुंबरकर यांनी केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नशाबंदी मंडळाच्या शाखा सिंधुदुर्गचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.