
मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमध्ये पु. ल. देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक पुरस्कार ‘दै. कोकणसाद’च्या दिवाळी अंकास देऊन गौरव करण्यात आला. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात धुरु हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सचिन परब आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ‘दै. कोकणसाद’चे संपादक संदीप देसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, कवी एकनाथ आव्हाड, कामगार नेते दिवाकर दळवी, चितळे उद्योगसमूहाचे राहुल जोगळेकर, दादर सार्वजनिक वाचनालयाचे सेक्रेटरी यतीन कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त विकास होशिंग उपस्थित होते. दिवाळी अंक स्पर्धेसाठी राज्यभरातून तसेच इंदूर, शिकागो, सिंगापूर येथून सुमारे १७३ अंक स्पर्धेसाठी आले होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सचिन परब म्हणाले, अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी याचा प्रचार करण्यासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईने संकल्प केला आहे. अभिजात बरोबरच ती अधिकाधिक व्यवहारी कशी होईल, यासाठी प्रयत्न झाला तरच हे शक्य आहे.
४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील उत्कृष्ट दिवाळी अंकांचा विविध पुरस्कार देऊन सचिन परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागत प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, सूत्रसंचालन कार्यवाह नितीन कदम, राजन देसाई, तर आभार प्रदर्शन दिगंबर चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष विजय कदम, मनोहर साळवी, सुनील कुवरे, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, आबास आतार यांनी परीश्रम घेतले.