सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत अभ्यास दौऱ्याला प्रारंभ !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 07, 2023 12:16 PM
views 333  views

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२३-२४ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत दुसरा अभ्यास दौऱ्याला आज प्रारंभ झाला. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या अभ्यास दौऱ्याला सुरुवात झाली. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांच्यासह ४५ जणांचा यात समावेश आहे. ६ ते ९ डिसेंबर या कालावधीत हा दौरा होणार आहे. 

        राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२३-२४ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत पहिला अभ्यास दौरा नोव्हेंबर मध्ये सोलापूर जिल्ह्यात गेला होता. यामध्ये ४५ जणांचा समावेश होता. दरम्यान, आज दुसरा अभ्यास दौरा सुरू झाला. ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मालवण गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, वेंगुर्ला प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, मालवण पंचायत समिती कृषी अधिकारी आर जी कांबळे, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पी आर फाले, ग्राम विकास अधिकारी एन एस माणगावकर तसेच विस्तार अधिकारी कृषी, पशुवैद्कीय पर्यवेक्षिका, मुख्यासेविका, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, १५ सरपंच, दोन उपसरपंच, दोन ग्राम पंचायत सदस्य यांचा यात समावेश आहे. 

      या अभ्यास दौऱ्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील बारामती पंचायत समिती, बारामती कृषी विज्ञान केंद्र, शिरूर तालुक्यातील बावळेवाडी गावातील उत्कृष्ट शाळा आणि अंगणवाडी, खेड तालुक्यातील उत्कृष्ट कानेवाडी तर्फ चाकण ग्राम पंचायत, मुळशी तालुक्यातील उत्कृष्ट सांडपाणी व्यवस्थापन केलेली मान ग्रामपंचायत, मुळशी तालुक्यातील उत्कृष्ट सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन केलेली पिरंगुट ग्रामपंचायत आदी ठिकाणी भेटी देवून सहभागी अभ्यास करणार आहेत.