
कणकवली : 23 नोव्हेंबर - 'डर होना ही चाहिए ' ... एक 33 वर्षाचा युवक सरकारच्या मनात धडकी भरवितो यातच आपले यश आहे .राज्यातील जनतेसाठी काम करत असताना आम्हाला फासावर लटकवले तरी चालेल. आम्ही राज्याच्या जनतेसाठी कायम काम करत राहू .राज्यात जनतेच्या विरोधात बसलेले सरकार लवकरच कोसळेल. हे घटनाबाह्य सरकार आहे त्यामुळे तुम्ही आजपासून निवडणुकीच्या कामाला लागा असा संदेश युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे कणकवली येथे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या निवासस्थानी खळा बैठकीदरम्यान दिला .
शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांच्या निवासस्थानी कलमठ येथे आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले . त्यांच्यासोबत खास.विनायक राऊत ,आम.वैभव नाईक, अरुण दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अतुल रावराणे, जानवी सावंत नीलम सावंत पालव आदी पदाधिकारी तथा युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले ,कोकणात शांत वातावरण आहे. म्हणूनच इथले काही लोक आम्हाला शिव्या देत आहेत. राज्यातले खोके सरकार तर आम्हाला घाबरूनच आहे हे सरकार दिल्लीतील केंद्र सरकारच्या इशारावर चालत आहे. त्यामुळे सगळे उद्योग गुजरातला गेले आहेत. कोकणात बारसू नाणार सारखे प्रकल्प डोक्यावर आणून ठेवले जात आहे. जिल्ह्यातील पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुका कशा लढायच्या याची तयारी आजपासून करा. कोकण पदवीधर मतदार संघापूर्वी जिथे जिथे निवडणुका झाल्या तेथे महाविकास आघाडी म्हणून आम्ही चांगली लढत दिली आहे .आमचे उमेदवाराही विजयी झाले आहेत. शिक्षक मतदार संघातही आम्ही विजयी झालो आहोत. त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवत असताना आपल्या हक्काचा प्रतिनिधीना मतदार करा. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी किमान दहा हजार मतदार नोंदवा. येत्या 9 डिसेंबर पर्यंत ही संधी आहे. आमचे सरकार असताना कोकणच्या विकासाकडे आम्ही गांभीर्याने पाहिले होते .म्हणूनच येथे चिपी सारखे विमानतळ सुरू झाले. वैद्यकीय महाविद्यालय झाले .अनेक विकास प्रकल्प सुरू झाले. परंतु राज्यातील खोके सरकारने कोकणकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.