मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्या !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 19, 2023 19:51 PM
views 89  views

सिंधुदुर्गनगरी :  शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना 2023  ही योजना दोन टप्यात लागु केली आहे. या योजनेमध्ये 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत नोंदणीकृत  किंवा अनोंदणीकृत दस्तऐवजांकरीता शासनास देय होणाऱ्या तथा वसुली पात्र मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सुट तथा सवलत लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी प्राची घोलप यांनी केले आहे.

1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या दरम्यान निष्पादीत केलेले संलेख असल्यास योजनेच्या पहिल्या टप्यात 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्क रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कमेस माफी देण्यात आलेली आहे. मुद्रांक शुल्क 1 लाख रूपयांपेक्षा अधिक असल्यास मुद्रांक शुल्कात 50 टक्के व दंडाच्या रक्कमेस संपूर्ण सुट देण्यात आली आहे. या कालावधीतील निष्पादीत दस्तऐवजांना योजनेच्या दुसऱ्या टप्यात 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडामध्ये 80 टक्के सुट. तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखाच्या वर असल्यास मुद्रांक शुल्कात 40 टक्के व दंडामध्ये 70 टक्के माफी देण्यात आलेली आहे.

1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान निष्पादीत केलेले संलेख असल्यास योजनेच्या पहिल्या टप्यात 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्क रक्कम 25 कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात 25 टक्के माफी व दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा कमी असेल तर दंडामध्ये 90 टक्के सुट, तसेच दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ 25 लाख एवढीच शास्तीची रक्कम देय असेल आणि उर्वरीत शास्ती माफ करण्यात येईल. मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटीपेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात 20 टक्के माफी तसेच दंडाची रक्कम 1 कोटी एवढीच रक्कम देय असेल आणि उर्वरीत शास्ती माफ करण्यात येईल, तसेच या कालावधीतील निष्पादीत दस्तऐवजांना योजनेच्या दुसऱ्या टप्यात 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्वत देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात 20 टक्के माफी व दंडाची रक्कम 50 लाखापेक्षा कमी असेल तर दंडामध्ये 80 टक्के सुट, तसेच दंडाची रक्कम 50 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ 50 लाख एवढीच शास्तीची रक्कम देय असेल आणि उर्वरीत शास्ती माफ करण्यात येईल. मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटीपेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात 10 टक्के माफी तसेच दंडाची रक्कम 2 कोटी एवढीच रक्कम देय असेल आणि उर्वरीत शास्ती माफ करण्यात येईल.अभय योजना 2023 योजनेचा लाभ घेण्याकरिता, दस्तऐवज व पुरक कागदपत्रांसह अर्ज सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत सी.ब्लॉक पहिला मजला, सिंधुदुर्गनगरी येथे अथवा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाकडे सादर करावा असे आवाहनही मुद्रांक जिल्हाधिकारी प्राची घोलप यांनी  केले आहे.