विरोधानंतर कणकवलीतील स्टॉल हटाव मोहीम थांबली…

उड्डाणपुलाखाली पोलीस बंदोबस्त कायम; ४ वर्षानंतर आत्ताच कारवाई का?, संदीप मेस्त्री…
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 29, 2023 17:51 PM
views 105  views

कणकवली : कणकवली शहरात उड्डाणपुलाखाली आज दुपारनंतर स्टॉल हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी या मोहिमेला आक्षेप घेतला. त्‍यानंतर ही कारवाई थांबली आहे. महामार्ग प्रशासनाने गेल्‍या चार वर्षात उड्डाणपुलाखाली काय करणार ते जाहीर केलेले नाही. त्‍यानंतर आज अचानक कारवाई कशासाठी असा सवाल संदीप मेस्त्री यांनी यावेळी केला.

कणकवली शहरातील उड्‍डाणपुलाखालील दोन महिन्यापूर्वी महामार्ग विभागाने स्टॉल हटाव मोहीम राबवली हाेती. यात नरडवे नाका ते एस.एम. हायस्कूल या भागातील उड्डाणपुलाखालील सर्व स्टॉल हटवले होते. त्‍यानंतर गेल्‍या दोन महिन्यात लाकडी बांबू रोवून काही ठिकाणी पुन्हा स्टॉल लावण्यात आले होते. ते हटविण्यासाठी दुपारी साडेबारा वाजल्‍यानंतर पुन्हा हे स्टॉल हटविण्याची कारवाई सुरू झाली. यामुळे विक्रेत्‍यांमध्ये पळापळ सुरू झाली.

या दरम्‍यान कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी पटवर्धन चौकात स्टॉल हटाव कारवाईला विरोध केला. उड्डाणपुलाखालील गोरगरीब विक्रेते आपला व्यवसाय करत आहेत. त्‍यांच्यावर कारवाई नको असे संदीप मेस्त्री म्‍हणाले. तसेच महामार्ग उभारणी पूर्ण झाल्‍यानंतर चार वर्षात उड्डाणपुलाखालील उद्यान किंवा अन्य कोणतेही उपक्रम महामार्ग विभागाने राबवलेले नाहीत. आता स्टॉल हटाव करून पुलाखाली गार्डन किंवा अन्य काही करणार आहात का? त्‍याबाबतची माहिती द्या त्‍यानंतरच स्टॉल हटाव करा अशी भूमिका संदीप मेस्त्री यांनी मांडली. त्‍यानंतर काही स्टॉलधारकांनी हटाव मोहिमेला विरोध केला. त्‍यामुळे तातडीने स्टॉल हटाव मोहीम थांबविण्यात आली. मात्र शहरातील पटवर्धन चौकात तसेच उड्डाणपुलाखालील मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.