
वैभववाडी : रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामामुळे आखवणे, भोम -मौदे एसटी वाहतूक बंद असल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.या मार्गाचे काम युद्धपातळीवर करून या मार्गावरील एसटी वाहतूक सुरू करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या आखवणे- भोम मौदे या गावांना जोडणाऱ्या हेत ते मौदे या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे.याकरिता हेत शेवरी फाटा ते मौदे एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे .यांचा फटका शाळकरी विद्यार्थ्यासह नागरिकांना बसला आहे.या भागातील अनेक विद्यार्थी शाळा, कॉलेजसाठी एसटीने ये जा करतात.ऐन परीक्षेच्या काळात एसटी वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.तसेच विद्यार्थ्यांना हेत शेवरी फाट्या पर्यंत पायपीट करावी लागत आहे.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच गावातील वयोवृद्ध व आजारी रुग्ण याची गैरसोय होत आहे.या मार्गावरील एसटी वाहतूक बंद असली तरी इतर वाहतूक सुरू आहे.त्यामुळे केवळ एसटी वाहतूकच बंद का करण्यात आली आहे असा सवाल ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.