रत्नागिरी : जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू असून चाकरमानी आनंदात आहेत. दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन झाले, आता गुरुवारी (ता. १२) गौरी-गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागतील. त्याकरिता रा. प. महामंडळाने जादा फेऱ्यांद्वारे मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे येथे जाण्याकरिता जवळपास २५५३ फेऱ्यांचे नियोजन केले आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
ऑनलाईन बुकिंगप्रमाणे या वर्षी ग्रुप बुकिंगलाही चांगला प्रतिसाद लाभला आहे. गुहागर तालुक्यातून ग्रुप बुकिंगला सर्वाधिक म्हणजे २०८ गाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. थेट गावातल्या घरापासून तुमच्या मुंबई, ठाणे, बोरिवली, नालासोपारा आदी भागांतील घरापर्यंत एसटी पोहोचत असल्याने ग्रुप बुकिंग फायदेशीर ठरते. सुरक्षित वाहतुकीसाठी चालक, वाहकांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
गणेशोत्सवासाठी ३ ते ७ सप्टेंबर या कालावधीत राज्य परिवहन महामंडळातर्फे मुंबई, बोरिवली, ठाणे आदी भागांतून ३००९ जादा फेऱ्यांमधून चाकरमानी दाखल झाले. महामार्गावरून प्रवासाला वेळ लागला तरी गणेशभक्तांची नेहमी एसटीला पसंती असते. त्यामुळे आता चाकरमान्यांच्या परतीसाठीही एसटीने जादा फेऱ्यांची व्यवस्था केली आहे.
गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला सुरवात करणार आहे. १२ सप्टेंबरला १८७ बसेस, १३ ला ८३२, १४ ला सर्वाधिक म्हणजे ९२९ सोडण्यात येणार आहेत. १५ सप्टेंबरला ३३१, १६ ला १०८, १७ ला ७७ आणि १८ ला ८० फेऱ्या सोडल्या जातील. १९ व २० तारखेलासुद्धा फेऱ्या सोडण्यात येणार असून त्याचे आरक्षण सुरू आहे. या परतीच्या प्रवासाकरिता प्रत्येक आगारात अन्य आगारांतून आलेल्या जादा एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच त्या त्या आगारांच्या बसेसचा उपयोग केला जाणार आहे. बाहेरील आगारातून आलेल्या ७३५ बसेस व जिल्ह्यातील १०८ बसेसच्या माध्यमातून २५५३ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व चालक, वाहकांना आणि आगार व्यवस्थापक, वाहतूक नियंत्रक, स्थानक प्रमुख आदींना परतीच्या प्रवासाबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आगाराचे नाव ऑनलाईन आरक्षण, ग्रुप बुकिंग एकूण फेऱ्या
दापोली ४१५ ५१ ४६६
खेड २७१ ६८ ३३९
चिपळूण ३०६ ६२ ३६८
गुहागर १३१ २०८ ३३९
देवरुख १९२ १११ ३०३
रत्नागिरी १४८ ६३ २११
लांजा १२६ ५५ १८१
राजापूर १७७ ४६ २२३
मंडणगड ७२ ५१ १२३
एकूण १८३८ ७१५ २५५३