अखेर कुवळे - भरणी - तांबळवाडी एसटी फेरी सुरू !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 14, 2024 14:48 PM
views 188  views

देवगड  : देवगड कुवळे-भरणी - तांबळवाडी- कुवळे या मार्गांवर शालेय फेरी सुरू कराव्यात, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून होत होती.याची गंभीर दखल शिवसेना युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी घेत विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांची भेट घेत सदर फेऱ्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी केली होती. 

ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाचे एस.टी. बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शालेय ये-जा करणे शक्य होत नाही.भरणी गावातील मुलांना शाळेत येण्याकरिता एस.टी. बसची सुविधा नाही. शाळा सुटल्यानंतर सायंकाळी कणकवली आगाराची कणकवली- कुवळे बस मुलांच्या परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध आहे. सकाळच्या वेळी मुलांना येण्यासाठी देवगड आगारातून स. ६.२० वा. सुटणारी देवगड-रेंबवली बसफेरी कुवळे परबवाडी येथून व्हाया भरणी-तांबळवाडीमार्गे परत रेंबवली अशी करावी. ग्रामीण भागात एस.टी. बस सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी, काही खासगी वाहतुकीने प्रवास करावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. ही गैरसोय दूर करून विद्यार्थ्यांना एस.टी. बसची सुविधा मिळवून द्यावी, अशी मागणी सुशांत नाईक, मिलिंद साटम, अमित साळगावकर यांनी विभाग नियंत्रकांकडे केली होती. याची दखल घेतली गेली व या एसटी फेऱ्या सुरू केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.