
दोडामार्ग : गेले कित्तेक महिने तिलारी घाटमार्गे बंद असलेली एसटी बस तिलारी घाटातून २ एप्रिलपासून पूर्ववत सुरू होणार आहे. त्यामुळे या घाटातून एसटी बस सुरू होण्याची सर्वसामान्यांची प्रतीक्षा संपली आहे.
तिलारी घाट २० जून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत एसटीसह अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले होते. यावेळी एसटी बंद झाल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी, कामावर जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडू लागला. मात्र घाटातून अवजड वाहतूक राजरोसपणे सुरू होती. या घाटातून एसटी वाहतुक पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. प्रविण गवस, दत्ताराम देसाई, कोदाळी (ता. चंदगड) माजी सरपंच अंकुश गावडे यांसह स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी एसटी सुरू होण्यासाठी वारंवार आंदोलने, उपोषणे केली होती. त्यामुळे प्रशासन नरमले व घाटातील खचलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम मंजूर करून घेत लवकरात लवकर काम पूर्ण केले. त्यानंतर चंदगड सार्व. बांध. उपविभागाने एसटी विभागाला पत्र देत घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे कळविले होते. यावेळी चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजी पाटील यांनीदेखील घाटातून एसटी बस सुरू करण्याची मागणी पत्राद्वारे संबंधित विभागाकडे केली होती. मात्र स्थानिक आमदारांच्या मागणीकडे कानाडोळा करत घाटात धोकादायक ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसविण्याची मागणी एसटी विभागाने चंदगड सार्व. बांध. उपविभागाकडे केली.
कोल्हापूर विभाग नियंत्रकांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या आगार व्यवस्थापकांना आदेश पारित केले आहेत. या आदेशात म्हटले आहे, तिलारी घाटातील मार्गाचा १९ मार्च रोजी रा.प. प्रशिक्षण बसद्वारे पुर्नसर्व्हे करण्यात आलेला असून, हा रस्ता रा.प. वाहतुकीच्या दृष्टीकोनातून योग्य झाला आहे. तरी, या मार्गावर आपल्या आगारामार्फत चालनात असणारी रा.प. वाहतूक ०२ एप्रिल पासून पुर्वीप्रमाणे सुरु करण्यात यावी. तिलारी घाटातून एसटी सुरू होण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ यांनी पाठपुरावा केला आहे. त्याला अखेर यश आले आहे. या कामात स्थानिक आमदार शिवाजी पाटील यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभल्याचे मत प्रवीण गवस यांनी बोलताना व्यक्त केले.