दापोली आगाराचं एकाच दिवसात ४ लाखांचं नुकसान

Edited by: मनोज पवार
Published on: September 03, 2024 12:45 PM
views 360  views

दापोली :  ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे प्रवाश्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. सर्वच प्रवाशी एकदम गोंधळून गेले होते.

       एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून राज्यव्यापी संप आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यस्तरावरील १३ संघटनेची कृती समितीनं संपाची हाक दिली आहे. एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊनदेखील कोणताही तोडगा निघाला नसल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. 

         आज मंगळवारी सकाळपासून दापोली आगारातील पहाटे सुरु होणाऱ्या एस.टी. बस सेवेवर कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनामुळे परिणाम झाला आहे. सकाळपासूनच्या अनेक फेऱ्या धावल्याच नाहीत. एस.टी. बस स्थानकाबाहेर कर्मचारी कामावर हजर न होता धरणे आंदोलनात  सहभागी झाले आहेत. सकाळच्यावेळी एस. टी. वाहतूक कोलमडल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मिळेल त्या खाजगी वाहनाने दापोली पर्यंत पोहचाव लागलं. विद्यार्थ्यांची तर चांगलीच तारांबळ उडाली. दापोली आगरामध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. एस.टी बंद मूळे बहुतेक प्रवाशी ज्यांना शक्य ते रिक्षा, वडाप सेवा आशा खाजगी सेवांकडे धाव घेत होते. एस. टी. कर्मचारी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यामुळे सर्व आगारव्यवस्था कोलमडून गेली होती. 

संपामध्ये सर्वच कर्मचारी सहभागी झालेले आहेत. आज सकाळपासून संप पुकारल्याने प्रवाशांचे विद्यार्थ्यांचे खूपच हाल झाले. परंतु एस टी स्टँड मध्ये जे जे प्रवाशी प्रवासासाठी आले आहेत. त्यांना कुठल्या ठिकाणी जायचं आहे याची माहिती घेऊन प्रवाशांचे हाल व्हायला नको यासाठी त्या त्या ठिकाणी एक एक गाडी सोडून त्यांना आपापल्या घरी सोडण्याची व्यवस्था केली आहे. निव्वळ या संपामुळे आजचं दापोली आगाराच किमान अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अजूनही संपबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही अशी माहिती दापोली आगरप्रमुख श्रीम. मधाळे यांनी दिली.