सिंधुदुर्गात लवकरच धावणार एसटी महामंडळाच्या मिनी बस

पालकमंत्र्यांनी घेतली बैठक
Edited by:
Published on: March 06, 2025 16:09 PM
views 454  views

मुंबई  : सिंधुदुर्गात लवकरच एसटी महामंडळाच्या मिनी बसेस दाखल होणार आहेत. जिल्ह्यातील काही बसस्थानकांची डागडुजी व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री विवेक भिमणवार यांची विधानभवनातील आपल्या दालनात बैठक घेऊन चर्चा केली.


पालकमंत्री नितेश राणे यांनी आज एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमणवार यांच्याशी आपल्या दालनात घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील एसटी सेवांबाबत आणि कारभाराबाबत प्रदीर्घ चर्चा केली.पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात मिनी बस सेवा सुरू करणे तातडीची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.या मागणीला एसटी महामंडळाच्या संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मिनी बस सेवा सुरू करण्याचे सांगितले.


पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी जिल्ह्यातील काही बसस्थानके दुरावस्थेत असल्याचे ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या बसस्थानकांची तात्काळ डागडुजी करून सुशोभीकरण करण्याच्या सूचना ही पालकमंत्री यांनी दिल्या. गावा गावांचा संपर्क वाढविण्यासाठी बसेच्या फेऱ्यात वाढ करण्याच्या सूचना ही पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच   रिक्त असलेले विभाग नियंत्रक पद तात्काळ भरण्याच्या सूचना ही अधिकाऱ्यांना दिल्या.