
कणकवली : मुंबई गोवा हायवेचे चौपदरीकरण झाल्यानंतर नांदगाव तिठा व ओटव फाटा येथे उड्डाण पुल बांधण्यात आल्यामुळे ब-याच एसटी महामंडळाच्या बसेस प्रवासी असताना सुध्दा उड्डाण पुलावरुन जातात . त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. नांदगाव ओटव फाटा येथे 25 गावांचे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने अनेक वयोवृध्द रुग्ण या बसने येत असतात त्यांना विनाकारण पायपीट करावी लागते. या विषयाबाबत अनेकदा निवेदन देवूनही कोणतीही कारवाई न झाल्याची बाब नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी विभाग वाहतूक नियंत्रक अभिजित पाटील यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर संतप्त झालेल्या विभाग वाहतूक नियंत्रक अभिजित पाटील यांनी जिल्हा पेटला तरी चालेल कुणाची गैय करणार नाही. नांदगाव तिठा, ओटव फाटा येथे एसटी बसेसना न थांबवल्यास पहिल्यांदा वाहतूक नियंत्रकांचे आणि नंतर चालक , वाहकांचे निलंबन करणार असल्याचे आश्वासन दिले.
कणकवली येथे नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एसटी बस प्रवाशांच्या समस्यांबाबत एसटी महामंडळाचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांची भेट घेतली . यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर , असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , उद्योजक सुभाष बिडये , पत्रकार ऋषिकेश मोरजकर सामाजिक कार्यकर्ते कमलेश पाटील , कृष्णा वायंगणकर , तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नांदगाव तिठा व ओटव फाटा येथील उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ते आहेत. या रस्त्यावरुन एसटीच्या बसेस प्रवाशांना उतरवण्यासाठी थांबण्याची गरज आहे. नांदगाव तिठा हा देवगड , फोंडा , व तळेरे कडे जाणा-या प्रवाशांसाठी सोयीचे मध्यवर्ती ठिकाण आहे. मात्र अनेक बसेस उड्डाण पुलावरुन जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय तातडीने थांबवली पाहिजे . त्यासाठी सर्व आगारप्रमुख व एसटी चालकांना सुचना देण्याची मागणी चेअरमन भगवान लोके यांनी केली. तर एसटी चालकांकडून ओटव फाटा येथे उड्डाण पुलावर बस थांबवून यापूर्वी प्रवाशांना कसा त्रास झाला,याबाबत माहिती ऋषिकेश मोरजकर यांनी दिली.
त्यामुळे यापुढील काळात नांदगाव तिठा व ओटव फाटा या दोन्ही ठिकाणी उड्डाणपुलावर बस न थांबवता सर्व्हिस रस्त्यावर थांबवावी. त्यामुळे ओटव फाटा येथील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येणा-या रुग्णांना व नातेवाईकांना दिलासा मिळेल. ग्रामीण भागातून वयोवृध्द गोरगरिब रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात , त्या रुग्णांसाठी आणि प्रवाशांसाठी तरी तातडीने सर्व एसटी चालकांना आदेश देण्याची मागणी नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर यांनी केली.
त्यावर विभाग वाहतूक नियंत्रक अभिजित पाटील यांनी संबंधित अधिका-यांना बोलवून तातडीने सर्व आगार प्रमुखांना लेखी पत्र काढण्याच्या सुचना दिल्या . तसेच संबंधित अधिका-यांशी दूरध्वनीवरुन नांदगाव तिठा व ओटव फाटा या ठिकाणी सर्व बसेस थांबल्या पाहिजेत. बसेस न थांबल्यास पहिल्यांदा वाहतूक नियंत्रक आणि चालक ,वाहकांचे निलंबन केले जाईल , असा इशारा दिला. यावेळी शिष्टमंडळाने समाधान व्यक्त करत उद्या पासून अंमलबाजावणी करा अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.