केळूस येथिल श्री तारादेवी फुगडी ग्रुप ठरतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरस

Edited by:
Published on: October 17, 2024 06:07 AM
views 230  views

वेंगुर्ला : महाराष्ट्राच्या लोकधारेत अनेक पारंपरिक प्रकार आहेत. यामध्ये फुगडी हा प्रकार अलीकडच्या काळात कमी होत चालला होता. पण संस्कृतीचा वारसा जपण्याच्या हेतूने आणि त्यातून रसिक प्रेक्षकांची करमणूक करण्याच्या उद्देशाने साधारणत: नऊ वर्षापूर्वी केळूस गावचे ग्रामदैवत श्री. तारादेवी मातेच्या नावाने पारंपरिक फुगडी ग्रुप तयार झाला. सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या अडीअडचणींवर मात करुन आज श्री. तारादेवी फुगडी ग्रुपने आपला वेगळा ठसा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटविला आहे. जिल्ह्यात होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धेत हा ग्रुप सहभागी होऊन आपला अव्वलपणा दाखवून देत आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, जत्रोत्सव, तसेच विविध धार्मिक सणांच्या निमित्ताने या फुगडी ग्रुपला सादरीकरणासाठी निमंत्रित केले जाते. पारंपरिक फुगडींना आधुनिकतेची जोड देऊन अतिशय सुंदर सादरीकरण या ग्रुपच्या माध्यमातून केले जाते. 

अलिकडच्या काळात तर दोन फुगडी ग्रुपमध्ये जुगलबंदी सारख्या प्रकाराने जोर धरंलाय आणि या जुगलबंदीमध्ये श्री. तारादेवी फुगडी ग्रुपला आवर्जून निमंत्रित केले जाते. पारंपरिक फुगडीच्या निमित्ताने अव्वल स्थानावर पोचून श्री. तारादेवी फुगडी ग्रुप केळूस गावाचे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवित आहे. त्यामुळे केळूसच्या ग्रामस्थांकडून श्री. तारादेवी फुगडी ग्रुपचे कौतुक होत आहे.