डेगवेत श्री महालक्ष्मी स्थापेश्वर जत्रोत्सव

Edited by: विनायक गावस
Published on: February 05, 2024 14:12 PM
views 78  views

सावंतवाडी : ४८ खेड्यांचा अधिपती असलेल्या डेगवे येथील जागृत श्री महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार ५ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक होईल. त्यानंतर श्रीदर्शनास सुरुवात होईल. श्री स्थापेश्वरास केळी ठेवणे, नवस बोलणे - फेडणे तसेच श्री महालक्ष्मीची ओटी भरणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा होईल. त्यानंतर  दत्त माऊली दशावतार मंडळाचा 'मिनाक्षी सुंदरेश्वर' हा नाट्यप्रयोग सादर होईल. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव स्थापेश्वर महालक्ष्मी देवस्थान समिती व डेगवे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.