सेवानिवृत्त बौद्ध संघटनेच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

देवगड येथे कार्यक्रम संपन्न
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 16, 2023 19:44 PM
views 111  views

देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त बौद्ध अधिकारी, कर्मचारी संघटनेने डेरवण येथील बीकेएल वालावलकर रुग्णालयाच्या सहकार्याने जामसंडे येथील दीर्घायु हेल्थ सेंटर येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सेवानिवृत्त संघटनेच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक करून लवकरच असे उपक्रम सतत घ्यावेत, अशा अपेक्षाही व्यक्त केल्या.

या शिबिराचे उद्घाटन दीर्घायु हेल्थ केअर सेंटरचे प्रमुख डॉ. अरुण गुमास्ते व सेवा निवृत्त संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते समई प्रज्वलनाने करण्यात आले. प्रारंभी संस्थेचे सचिव मोहन जाधव यांनी प्रास्ताविक करून संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी डॉ. गुमास्ते यांनी सेवानिवृत्त संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करून आरोग्य शिबिराचे महत्त्व विशद केले व शुभेच्या दिल्या. वालावलकर रुग्णालयाचे सामाजिक वैद्यकीय कार्यकर्ते संदीप पाटील यांनी रुग्णालयाच्या विविध योजनांची माहिती दिली. या शिबिरात जनरल सर्जन डॉ. मुदस्सर शेख, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैष्णवी गोरे, जनरल फिजिशियन डॉ. अक्षय गांगुर्डे तसेच अस्तिरोग तज्ज्ञ डॉ. अनुज पटेल, नेत्रविकास अधिकारी सौरभ दलाल, इळये पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीतेश साळवी इत्यादींनी रुग्ण तपासणी केली.

सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी तथा संस्थेचे कार्याध्यक्ष अरविंद वळंजू, संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन जामसंडेकर यांनी केले तर मोहन जाधव यांनी आभार मानले.

यावेळी सेवानिवृत्त संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री मिलिंद जाधव, श्रद्धा कदम, आनंद धामापुरकर, विजय कदम, मोहन जामसंडेकर यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश कदम, प्रकाश जाधव, आनंद देवगडकर, विलास जाधव, गणपत जाधव, प्रकाश वळंजू, परिचारिका प्रचीता जाधव, रुपाली अंब्रापूरकर यांच्यासह सेवानिवृत्त संघटनेचे पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीने रुग्णासाठी चहापानाची व्यवस्था करून सहकार्य केले.