
वेंगुर्ला : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोलीयांच्या संयुक्त विद्यमाने महिला पोलिसांसाठी घेण्यात आलेल्या खुल्या निबंध लेखन स्पर्धेत राज्यातून महिला पोलीस भगिनी यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. "इमान इथल्या मातीशी, माणुसकीच्या नात्याशी..." या ब्रीदवाक्याशी सुसंगत राहून, पोलीस खात्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या दुहेरी जबाबदारीची जाणीव जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
स्पर्धेचा विषय होता "कठोर वर्दीत ममतेचा स्पर्श – महिला पोलिसांची दुहेरी जबाबदारी". राज्यभरातून विविध जिल्ह्यांतील महिला पोलिसांनी आपल्या अनुभवांवर आधारित हृदयस्पर्शी ४२ जणांनी निबंध सादर केले. या निबंधांतून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठा, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि त्यामधील संघर्ष यांचे प्रभावी चित्रण झाले.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक सुनीता युवराज पवार (रत्नागिरी), द्वितीय क्रमांक सुमैया महेबुब सय्यद (छत्रपती संभाजी नगर), तृतीय क्रमांक संपदा विश्वनाथ ठाकूर (रत्नागिरी), उत्तेजनार्थ प्रथम सावी पाटील (सिंधुदुर्ग), उत्तेजनार्थ द्वितीय सोनाली पाटकर (सिंधुदुर्ग).
स्पर्धेतील प्रत्येक निबंधात महिला पोलिसांचे कुटुंबीयांसोबत असलेले नाते, ड्युटीवर असताना समाजासाठी बजावलेली भूमिका आणि वैयक्तिक आयुष्यातील आव्हाने यांचे अत्यंत संवेदनशीलपणे वर्णन करण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला चे मराठी विभाग प्रमुख प्रा. पी.आर. गावडे आणि प्रा. डॉ.सचिन परुळकर यांनी केले. विजेत्यांना प्रतिष्ठान च्या आगामी महोत्सवात सन्मानपत्र,चषक व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. आयोजकांच्या वतीने वेताळ प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंचाचे अशोक दाभोलकर यांनी सर्व सहभागी महिला पोलिसांचे अभिनंदन केले.या स्पर्धेमुळे पोलीस खात्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला गेला असून, समाजामध्ये त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात यश आले आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे महिला पोलिसांचे मनोबल वाढवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.