
बांदा : गोवा-बांबोळी येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने जीएमसीच्या रक्तपेढी विभागाने सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सावंतवाडी - दोडामार्ग - वेंगुर्ला तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांच्याशी संपर्क साधून तात्काळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत आवाहन केले होते. सदर आवाहनाला संजय पिळणकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सातार्डा - देऊळवाडी येथे जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नं १ येथे शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२२ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
यावेळी रक्तदान शिबिरात ३२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शिबीर यशस्वी केले. यात २ महिलांनी रक्तदान केले. तर ३ डोनर हे निगेटिव्ह गटाचे होते हे विशेष! सदर रक्तदान शिबिरास रवळनाथ मित्रमंडळ, सातार्डाचे मोठे सहकार्य लाभले. सलग दोन दिवस दोडामार्ग व सातार्डा येथे २ रक्तदान शिबीरे घेतल्याने जीएमसी ब्लड बँकेच्या टीमने सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे आभार मानले तर विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांचे विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी रक्तदान शिबिराचे उदघाटन सातार्डा सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू, जीएमसी रक्तपेढीचे डॉ. संजय, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठांचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वेंगुर्लेकर, सागर नाणोसकर, अॅड. चांदेकर, मुख्याध्यापक गावित सर, संजय पिळणकर, अक्षय मयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री. गावित यांनी मानले.