
सिंधुदुर्ग : अथायु मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल कोल्हापूर व महिला व बाल रुग्णालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिरास रूग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याचा शुभारंभ कुडाळ रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉ. संजय वाळके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आला.
गोरगरीब रुग्णांना मोफत रुग्णसेवा व शस्त्रक्रिया अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर या रुग्णालयामार्फत होते. त्यामुळे मोठा दिलासा रुग्णांना मिळतो असे उद्गार जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी काढले. तसेच अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर मार्फत गेल्या सात-आठ वर्षांमध्ये हजारोंच्या संख्येने मोफत शस्त्रक्रिया आदी मोफत सुविधा महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना अंतर्गत दिली जाते. दरवर्षी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात अशी महाआरोग्य शिबिरे घेऊन या हॉस्पिटलमार्फत मोफत सेवा दिली जाते असे ते म्हणाले. यावेळी अथायुचे मदन गोरे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अथायु हॉस्पिटलचे वैभव काटकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप चौगुले, डॉ. मुळीक, सामाजिक कार्यकर्ते संजय तानावडे आदींसह रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. या शिबिरामध्ये बायपास शस्त्रक्रिया, एन्जोप्लास्टी, हृदयाला वॉल बसवणे, मुतखडा, पित्ताशयाच्या पिशवीत खडे, व्हेरिकोज व्हेन्स, हाडांची शस्त्रक्रिया, मणक्यांचे आजार अशा विविध प्रकारच्या रुग्णांची तपासणी करून रुग्णालयामार्फत कोल्हापूर अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच बस सेवा उपलब्ध होणार आहे अशी माहीती श्री. मसुरकर यांनी दिली.