‘स्पाईस व्हीलेज’ कृषी पर्यटनासाठी कामाला लागा!

मत्स्यपालनातून रोजगार निर्मिती करा : मंत्री दीपक केसरकर
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 04, 2022 21:05 PM
views 219  views

सिंधुदुर्गनगरी : स्पाईस व्हीलेजच्या माध्यमातून कृषी पर्यटन वाढवावे. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाने महिलांना रोजगार निर्मिती करावी, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा सिंधुरत्न समृध्द योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सभागृहात आज सिंधुरत्न समृध्द योजनेबाबत आढावा बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, आयएएस अधिकारी करिष्मा नायर  उपस्थित होते.

जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी विषय वाचन केले. यावेळी सविस्तर आढावा घेताना शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले बंदरांचा विकास चांगल्या पद्धतीने करा. मोबाईल पेट्रोलपंप बंदरांच्या ठिकाणी उपलब्ध करता येतील का याबाबत माहिती घ्यावी. सोलर ड्रायर जेट्टीच्या ठिकाणी ठेवा. आपल्याला काहीतरी घडवायचं आहे, ही भावना ठेवून अधिकाऱ्यांनी कामे करावीत. गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादनासाठी महिलांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी नियोजन तयार करा. किती महिलांसाठी आणि कसा रोजगार निर्माण करता येईल याचा समावेश असावा.

अधिकाऱ्यांना काही अडचण असल्यास त्याबाबत एकत्रितपणे संबंधित विभागाची बैठक मुंबई येथे घेतली जाईल. असे सांगून ते म्हणाले ज्या महिलांना प्रशिक्षण दिलय त्यांना मत्स्य विभागाने संपर्क करावा. खेकडा पालन योजनाही या जिल्ह्यात कार्यान्वित करावी. महावितरणने एक जिल्ह्याचे मॉडेल बनवावे चौपाटीवर रंगीत दिवे तर वनक्षेत्रात सौर दिवे बसवावेत.

पशुसंवर्धन विभागाने कुकूटग्राम तयार करावे. ‘स्पाईस व्हीलेज’ नावाने पर्यटनासाठी कृषी पर्यटन विकसित करावे. त्यासाठी महिनाभरात प्रकल्प प्रक्रीया सुरु करावी. काजू पासून ज्यूस कसं तयार करायचं, ते टिकवायचं कसं, याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना द्या. कोकम, करवंद, फणस, जांभूळ यांची लागवड वाढवावी. यासाठी संबंधित विभागांना निधी दिली जाईल, असेही ते म्हणाले.