भीषण ; भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक

Edited by: विनायक गांवस
Published on: October 15, 2025 20:21 PM
views 44  views

सावंतवाडी : जुन्या मुंबई गोवा महामार्गावर माजगाव तांबळगोठण येथे बुधवारी दुपारी तीन वाजता एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या ब्रेझा कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार फारूक हेरेकर (वय ५०, रा. माजगाव गरड) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

फारूक हेरेकर हे आपल्या दुचाकीवरून माजगाव येथून बांद्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी, बांद्यावरून सावंतवाडीच्या दिशेने यश आनंद पडते (वय २७, रा. शिरोडा नाका, सावंतवाडी) हा आपल्या ताब्यातील ब्रेझा कार  भरधाव वेगाने चालवत येत होता. माजगाव तांबळगोठण येथील वळणावर यश पडते याच्या भरधाव ब्रेझा कारने फारूक हेरेकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात फारूक हेरेकर रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, धडकेनंतर ब्रेझा कारने दुचाकीला तब्बल १०० मीटरपेक्षा अधिक अंतर फरफटत नेले. यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून कारच्या दर्शनी भागाचेही नुकसान झाले आहे. अपघात घडताच त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. जमलेल्या नागरिकांनी जखमी फारूक यांना तातडीने उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश जाधव तसेच श्री गावकर यांनी अपघाताचा पंचनामा केला.

दरम्यान, जखमी फारूक हेरेकर यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातासंदर्भात सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.