MIDCसाठी आडाळी ते बांदा लक्षवेधी लाँग मार्च

स्थानिक औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीचा निर्णय
Edited by: संदीप देसाई
Published on: August 14, 2023 18:19 PM
views 260  views

दोडामार्ग : 'एमआयडीसी'च्या आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भुखंड उद्योजकांना वितरित करुन हे क्षेत्र कार्यान्वित करण्याबाबत महामंडळ, राज्य शासन यांनी चालविलेल्या अनाकलनीय दिरंगाईच्या निषेधार्थ रविवार, दि. २० ऑगस्ट रोजी आडाळी ते बांदा असा आठ किलोमीटरचा लक्षवेधी लाँग मार्च आयोजित करण्यात आला आहे. हा लाँग मार्च जरी बांद्यापर्यंत असला तरी तो मंत्रालयावरील प्रतिकात्मक मार्च आहे, अशी माहिती आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीच्यावतीने सरपंच पराग गावकर यांनी आज दिली.


आडाळी येथे 720 एकर क्षेत्रात 2013 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत औद्यागिक क्षेत्र मंजूर झाले. या प्रकल्पाचे स्वागत करुन त्यानंतर वर्षभरातच स्थानिकांनी आपल्या जमिनीचे महामंडळाकडे हस्तांतरण करून दिले. पण महामंडळ, शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे आजही येथील औद्योगिक क्षेत्रातील भुखंडांचे वाटप उद्योजकांना झालेले नाही. यासाठी आडाळी स्थानिक औद्योगिक क्षेत्र विकास कृती समिती आणि 'घुंगुरकाठी' संचलित आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समितीच्यावतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तथापि, एक दशक संपले तरी औद्योगिक क्षेत्र गती घेण्याची कोणतीच चिन्हे नसल्याने या विषयाकडे शासनाचे आणि सर्व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी या लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.


या दोन्ही कृती समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या आम्ही ग्रामस्थांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आज पायाभूत सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अनेक उद्योजक आज आडाळीत उद्योग उभारणीसाठी इच्छुक आहेत. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सामिप्य, आठ किलोमीटरवरील राष्ट्रीय महामार्ग, सावंतवाडी, थिवी ही नजिकची रेल्वे स्थानके यामुळे  आडाळी  क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आले आहे. दोडामार्ग तालुका अतिशय दुर्गम असुन औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे. येथील युवकांना रोजगाराच्या कोणत्याही संधी येथे उपलब्ध नाहीत. यामुळेच या तालुक्यातील जनता या औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीकडे व येथे येणाऱ्या उद्योगांकडे डोळे लावुन बसलेली आहे.


आमच्या कृती समितीने बराच पाठपुरावा केल्यावर महामंडळाने जानेवारी २०२३मध्ये भूखंड वितरणासाठी जाहिरात प्रसिद्धीला दिली. यासाठी उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले. त्यांच्या मुलाखतीही पार पडल्या. मात्र अनाकलनीय कारणामुळे भूखंड वाटप झालेले नाही. येथे मंजूर असलेल्या सुमारे 200 कोटीच्या केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या केंद्रीय वनौषधी संशोधन प्रकल्प (आयुष) ला जागा देऊन आज तीन वर्षे झाली तरी प्रकल्पाची पायाभरणीही झालेली नाही. दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील किमान पाच हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल, एवढे उद्योग आज आडाळीत यायला तयार आहेत. मात्र लोकप्रतिनिधी आणि शासन यांना स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नाचे सोयरसुतक नाही. म्हणून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्हा जनतेलाच रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. हा लाँग मार्च अराजकीय असुन केवळ औद्योगिक क्षेत्राचा विकास या एकाच मुद्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केलेला आहे.


आडाळी एमआयडीसी प्रवेशद्वार येथुन सकाळी साडेनऊ वाजता लाँग मार्चला सुरुवात होईल. मार्च अतिशय शिस्तबद्ध रितीने असेल. लोकशाही मार्गाने व शांततामय रितीने हा मार्च काढण्यात येईल. लाँग मार्च मोरगाव, डेगवे, पानवळ मार्गाने बांदा महामार्ग सर्कल येथे सुमारे दोन तासात पोचेल. तेथे कोपरा सभा घेऊन मार्चची सांगता होईल. हा मार्च यशस्वी होण्यासाठी आडाळी दशक्रोशी, दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासप्रेमी नागरिकांनी २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता आडाळी येथे मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्यावतीने पराग गावकर, प्रवीण गावकर, सतीश लळीत व  आडाळी  ग्रामस्थांनी केले आहे.