
सावंतवाडी : भारत-पाक युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या शहीद हवालदार बाबली राजगे यांच्या वीरपत्नी सरस्वतीबाई राजगे यांचा सन्मान सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. विनायक दळवी चॅरीटेबल फाउंडेशन मुंबई व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या वीरनारी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी येथे हा सन्मान सोहळा पार पडला.
श्री पंचम खेमराज महाविद्यालयात या वीरनारी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमती राजगे यांचा ८८ वा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात गायिका मानसी केळकर यांच्या गीताने व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुरेश प्रभू, सौ. उमा प्रभू, कर्नल दीपक दयाल, प्रा. विनायक दळवी, प्राचार्य डॉ. डी.बी. भारमल, जयेश कामत, समीर राजगे, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उद्योजक मोहन होडावडेकर, सुर्यकांत राजगे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावर्षी भारत पाकिस्तानच्या युद्धाला ६० वर्षे आणि कारगिल युद्धाच्या विजयाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. शहीद हवालदार बाबली राजगे यांना २३ सप्टेंबर १९६५ च्या भारत-पाक युद्धाप्रसंगी वीरगती प्राप्त झाली. अशा वीरपत्नीचा सन्मान तिच्या वाढदिनी करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते वीरनारी सरस्वतीबाई राजगे यांना गौरविण्यात आले. यानंतर प्रा. विनायक दळवी, समीर राजगे, सौ. उमा प्रभू आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. मेट्रोवुमन अश्विनी भिडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर संदेश दिला. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषण युवराज लखमराजे भोंसले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाविका चव्हाण, सुत्रसंचालन डॉ. गणेश मर्गज व आभार वसीम सय्यद यांनी मानले.