दिव्यांग धीरजचा विज्ञान प्रदर्शनात विशेष सन्मान !

बांदा केंद्र शाळेचा विद्यार्थी
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 17, 2023 18:14 PM
views 170  views

बांदा : शिक्षण विभाग सावंतवाडी आयोजित ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बांदा नं. १ या केंद्रशाळेत इयत्ता सातवीत शिकत असलेल्या विशेष गरजाधारक विद्यार्थी धीरज सतीश पटेल या विद्यार्थ्याचा विज्ञान प्रदर्शनातील सहभागाबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

धीरज हा कर्णबधिर विद्यार्थी असून त्याच्या पालकांनी धीरजला इयत्ता पहिलीत जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ शाळेत दाखल केले. या शाळेतील शाळेतील शिक्षक व समुह साधन केंद्रातील विषय शिक्षकांच्या मदतीने सर्वसामान्य मुलांबरोबर शिक्षण घेत असून धीरज शाळेत विविध उपक्रमात उत्साहाने सहभागी होत असतो.

नुकत्याच शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात धीरज पटेल या विद्यार्थ्याने 'गरम हिटर फॅन' या प्रतिकृतीची मांडणी केली होती. विशेष गरजाधारक असून धीरजने विज्ञान प्रदर्शनात केलेल्या सादरीकरणाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, सावंतवाडी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, केंद्रप्रमुख संदीप गवस, मिलाग्रीस स्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा, सिस्टर मेबेल कार्व्हालो, पर्यवेक्षिका मेघना राऊळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत धीरजचे कौतुक करण्यात आले.

 यावेळी धीरजला मार्गदर्शन करणारे विषय शिक्षक शिवशंकर तेली, वर्गशिक्षिका उर्मिला मोर्ये, उपशिक्षक जे. डी. पाटील, रंगनाथ‌ परब,धीरजची आई अंजली पटेल उपस्थित होते.